सावधान ! दोडामार्ग तालुक्यात दिवसभरात अकरा कोरोना पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

तालुक्‍यात अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील बहुतेक रुग्ण गोव्यातून आलेले असल्याने मुंबईतील चाकरमान्यांपेक्षा अनेकांना गोवेकरांची भीती अधिक आहे.

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यात एकाच दिवशी कोरोनाचे 11 रुग्ण पॉझिटिव्ह मिळाल्याने खळबळ उडाली. त्यातील नऊ रुग्ण खानयाळे नाईकवाडी येथे, तर येथील वन विश्रामगृहावर आणि कुंब्रल येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळाला. एकूण 24 स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्‍यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 17 झाली आहे. 

परमे कासवाडी, डेगवे मोयझर, असनिये गावठण, कुंब्रल वरचावाडा आणि कुडासे देवमळा येथील पाच रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये मांगेली कुसगेवाडी, शिरंगे पुनर्वसन येथे प्रत्येकी दोन, साटेली भेडशी, दोडामार्ग वनविश्रामगृह आणि कुंब्रल वरचावाडा येथे प्रत्येकी एक आणि खानयाळे नाईकवाडी येथे दहा सक्रिय रुग्ण आहेत. 

तालुक्‍यात अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील बहुतेक रुग्ण गोव्यातून आलेले असल्याने मुंबईतील चाकरमान्यांपेक्षा अनेकांना गोवेकरांची भीती अधिक आहे. खानयाळे येथे आढळलेले नऊ रुग्ण गोव्यातून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या सर्वांच्या संपर्कात आणखी कितीजण आले असावेत ते शोधणे प्रशासनासमोर आव्हान असणार आहे. 

आता गाफील राहणे धोकादायक 
गेल्या काही दिवसांत तालुका प्रशासन फारसे गंभीर दिसले नाही. काही अपवाद वगळता सीमेवर तैनात पथकातील कर्मचारी, पोलिस, आरोग्य विभाग, नगरपंचायत प्रशासन, ग्रामनियंत्रण समिती बाहेरून येणाऱ्या व्यक्तींबाबत गंभीर दिसले नाहीत. तालुक्‍यात आता अचानक रुग्णांची संख्या वाढल्याने पुढचा धोका ओळखून सर्व यंत्रणांनी सतर्क होण्याची गरज आहे. 

संपादन - राजेंद्र घोरपडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be careful Eleven Corona Positive In a Day In Dodamarg Taluka