दुर्दैवी! मशागत केली, फवारणी केली, पण पावसाने केले सुपारीचे अंथरूण

शिवप्रसाद देसाई
Monday, 14 September 2020

अति पावसाने यंदा सलग दुसऱ्या वर्षी सुपारीची गळ झाली आहे. झोळंबे, तळकट, कोलझर, असनिये भागात तर अनेक बागायतदारांचे जवळपास 60 टक्‍के उत्पन्नच या गळ रोगामुळे उद्‌ध्वस्त झाले आहे. यामुळे कित्येक कुटुंबांचे वर्षभराचे पूर्ण अर्थकारणच कोलमडून गेले आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मशागत केली, फवारणी केली; पण पावसाने सगळ्या सुपारीच अंथरूण केले. बागेत बघाव तिथे जमिनीवर गळ आणि झाडे भकास झाली. गेल्यावर्षीची पूंजी बागेत ओतली; आता पुढचे वर्ष काय खायच? आणि कस जगायच? असा प्रश्‍न पंचक्रोशीतील सुपारी बागायतदारांना पडला आहे. मायबाप सरकारने आर्थिक मदत करावी, अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत. 

अति पावसाने यंदा सलग दुसऱ्या वर्षी सुपारीची गळ झाली आहे. झोळंबे, तळकट, कोलझर, असनिये भागात तर अनेक बागायतदारांचे जवळपास 60 टक्‍के उत्पन्नच या गळ रोगामुळे उद्‌ध्वस्त झाले आहे. यामुळे कित्येक कुटुंबांचे वर्षभराचे पूर्ण अर्थकारणच कोलमडून गेले आहे. 
दोडामार्ग तालुक्‍याच्या अर्थकारणात सुपारीचे महत्त्व खूप मोठे आहे. इथे शेकडो एकरवर याच्या बागा आहेत. यावर कित्येक कुटुंबांचा चरीनार्थ चालतो; मात्र अलीकडे वातावरणातील बदलाचा या पिकाला खूप मोठा फटका बसत आहे. गेली दोन वर्षे याची तीव्रता खूपच वाढली आहे. 

याची तिव्रता समजून घेण्यासाठी सुपीरीचे अर्थकारण लक्षात घ्यायला हवे. या भागात नारळ आणि सुपारी याच्या बागा आहेत. या पैकी नारळ नैसर्गिक आपत्तीमुळे बेभरवशाचा बनला आहे. अशावेळी सुपारीच बागायतदारांना आर्थिक आधार देते. या झाडाला देखभाल खर्च मोठा आहे. याला नियमित पाणी, मशागत आवश्‍यक असते. ठरावीक कालावधीनंतर पुर्नलागवड करावी लागते. शिवाय अलिकडे फवारणीचा खर्चही वाढला आहे. इतके करून पावसाळ्यात याचे पीक येते. नेमकी याच काळात अतिवृष्टी झाल्यास बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होवून मोठ्या प्रमाणात गळ होते. असे झाल्यास देखभाल खर्च वाया जातोच, शिवाय येणाऱ्या काळात पुन्हा बागेचे व्यवस्थापन आणि कुटुंबांचे अर्थकारण चालवणे कठिण बनते. पंचक्रोशीतील बागायतदार सलग दोन वर्षे या चक्रव्यूहात सापडले आहेत. 

गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीची शासनाने तुटपुंजी भरपाई दिली. अनेकांना ती मिळालीच नाही; मात्र यंदातरी स्थिती सुधारेल म्हणून बागायतदारांनी पदरमोड तसेच उदारीवर पैसे घेत बागेची देखभाल केली. फवारण्याही केल्या; मात्र यंदाही सलग पाऊस झाल्याने सुपारीची खूप मोठी गळ झाली आहे. झाडाखाली अक्षरशः कोवळ्या सुपारीच्या फळांचा सडा पडला आहे. पक्‍व सुपारी मिळणार नसल्याने बागायतदारांचे अर्थकारण पूर्ण कोसळले आहे. अनेकांना पुढचे वर्ष कसे काढायचे हा प्रश्‍न आहे. हे नुकसान लाखोंच्या घरात आहे. अजूनही ही गळ सुरूच आहे. 

बागायतदार ही कोवळी फळे जमा करून आणत आहेत. अनेकांची घरे हा गळ साठवून भरली आहेत. या गळाला तुटपुंजा दर मिळतो; मात्र तो जमा करून व सोलून बाजारात नेण्यापर्यंतचे आणि त्याला मिळणाऱ्या कवडीमोल किंमतीचे अर्थकारण जुळत नाही. सतत दोन वर्षे झालेल्या या प्रकारामुळे बागायतदार हैराण झाले आहेत. अनेकांनी नवी लागवड थांबवली आहे. शासनाने मदतीचा हात न दिल्यास भविष्यात नारळ, सुपारींच्या बागांचे कोकण केवळ पुस्तकात पहायला मिळण्याची भीती आहे. 

यंदा सुपारीला आतापर्यंत चांगला दर होता. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन गळ टाळण्यासाठी खूप मोठा खर्च करून फवारणी केली; मात्र अति पावसाने बागांमध्ये गळलेल्या सुपारीचा खच पडला आहे. सरकारने बागायतदारांना आधार द्यावा. 
- विश्‍वनाथ सखाराम गवस, बागायतदार झोळंबे 

गेले दोन महिने सततच्या पावसाने दोडामार्ग तालुक्‍यात सुपारीचे नुकसान झाले आहे. यामुळे बागायतदार अडचणीत आहेत. या नुकसानीचे महसूल प्रशासनाने पंचनामे करावे, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे. भरपाईसाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करावेत. 
- धनश्री गवस, उपसभापती, पंचायत समिती दोडामार्ग 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: betel growers in trouble in konkan sindhudurg