esakal | कोकणात सुपारीला लागतीये बुरशी ; उत्पन्नात होतीये घट
sakal

बोलून बातमी शोधा

the betel nut production decreases due to humus in konkan area ratnagiri

मोठ्या प्रमाणात होणाऱ्या फळगळतीमुळे सुपारीचे उत्पन्न घटले असून सुपारी बागायतदार आर्थिक संकटामध्ये सापडला आहे.

कोकणात सुपारीला लागतीये बुरशी ; उत्पन्नात होतीये घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर : गेल्या काही वर्षांपासून सुपारीच्या पिकावर काळ्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या फळगळतीमुळे सुपारीचे उत्पन्न घटले असून सुपारी बागायतदार आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. सुपारीवर प्रादुर्भाव झालेल्या रोगाचे उच्चाटन करण्यात कृषितज्ज्ञांनाही यश आलेले नाही. त्यामुळे आंबा, काजू, ऊस पिकाप्रमाणे कोकणातील सुपारी पिकालाही शासनाने विमा कवच द्यावे, अशी मागणी पंचायत समितीचे शिवसेनेचे माजी सभापती अभिजित तेली यांनी केली आहे. 

हेही वाचा - बाराखडीचे उच्चार संगीतमय करून इंटरॅक्‍टीव्ह चौदाखडीची निर्मिती ; कोकणातील अनोखा उपक्रम, राज्यातील विद्यार्थ्यांनाही लाभ

गेल्या काही वर्षांपासून सुपारी बागांमध्ये काळ्या बुरशीजन्य रोगाच्या साथीचा जोरदार फैलाव झाला आहे. या बुरशीजन्य रोगाच्या साथीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव कोवळ्या सुपाऱ्यांवर होऊन त्या गळून पडत आहेत. बागांमध्ये गळून गेलेल्या फळांचा अक्षरशः सडा पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे निम्मे उत्पन्न घटत आहे. त्याचा फटका सुपारी बागायतदारांना बसून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव नेमका कशामुळे होतो, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सुपारी पिकाला आंबा, काजू, ऊस यांच्याप्रमाणे शासनाने विमा कवच दिल्यास नुकसानीच्या काळात त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन भरपाई मिळू शकते, अशी मागणी तेली यांनी पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीमध्ये केली. 

पाच गावांत 200 हेक्‍टरवर 

राजापूर तालुक्‍यातील भू, पेंडखळे, खिणगिणी, तेरवण, कोतापूर आदी भागांमध्ये सुमारे 200 हेक्‍टर क्षेत्रामध्ये सुपारीच्या बागा शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या आहेत. सुपारी हेच या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असून उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणूनही सुपारीकडे पाहिले जाते.  

हेही वाचा - पावणेदोनशे दिवसांचे कोकणी जीवन उलगडले लॉकडाउनच्या डायरीतून
 

"भू पंचक्रोशीमध्ये सुपारी बागायतदारांची संख्या जास्त आहे. या परिसरातील अर्थकारण प्रामुख्याने या पिकावर अवलंबून आहे. या भागातील सुपारी बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाने नष्ट होत आहे. यातून बागायतदार कर्जबाजारी होणार आहे. संशोधन होऊन उपाययोजना होणे गरजेचे आहे. या नुकसानीचे महसूल, कृषी विभागाने पंचनामे करावेत." 

-चंद्रकांत जानस्कर, शेतकरी 

संपादन - स्नेहल कदम 

loading image