भैरिची पानंद घाट पूर्णतेसाठी निर्धार

bhairichi ghat committee meeting mangao konkan sindhudurg
bhairichi ghat committee meeting mangao konkan sindhudurg

माणगाव (सिंधुदुर्ग) - सार्वजनिक बांधकाम खाते व फॉरेस्ट खात्याने संयुक्तिक सर्वेक्षण करून केवळ 32 कोटींचा खर्च निर्धारित केलेला आंजिवडे (ता. कुडाळ) जवळील भैरिची पानंद घाट राजकीय वजन, रस्त्यावरची लढाई व न्यायालयीन मार्ग या त्रिसूत्रीचा अवलंब करत तत्काळ पूर्ण करायचाच, असा निर्धार या घाट कृती समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

सिंधुदुर्ग-कोल्हापूर हा सर्वांत कमी अंतराने जोडणारा भैरीची पाणंद हा शिवकालीन घाट कुडाळ तालुक्‍यातील आंजिवडे व कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्‍यातील पाटगाव दरम्यान आहे. केवळ साडेचार किलोमीटर अंतराच्या या घाटाला चालना देण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन महादेवाचे केरवडेतील बाळ केसरकर यांच्या फार्महाऊसवर केले होते. यावेळी हा घाट मार्ग दृष्टीक्षेपात आणण्यासाठी आता निर्णायक व आरपार लढा देण्याचे ठरले. 

व्यासपीठावर किशोर शिरोडकर, बाळ सावंत, आबा केसरकर, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष सुनील दुबळे, कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत, उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, दादा बेळणेकर, श्‍याम पावसकर, सुभाष भिसे, तुषार परब, एकनाथ केसरकर, साई नार्वेकर, बाळ केसरकर, अजित परब, श्रीकृष्ण नेवागी, नारायण लोहार, शंकर कोराने, कृष्णा पंदरे, राजन गुरव, रामचंद्र कदम, फिदलीस, विश्रांत केसरकर आदी उपस्थित होते. 

सुरुवातीला माणगाव खोऱ्यापुरता मर्यादित असलेल्या या लढ्यात आता मसुरकर व सुनील दुबळे यांच्या माध्यमातून सावंतवाडी व वेंगुर्ले तालुकाही उतरला आहे. या घाटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. सावंतवाडी, कोल्हापूर अंतर सध्या अस्तित्वात असलेल्या आंबोली, फोंडा, करुळ, भुईबावडा घाट मार्गापेक्षा 45 किलोमीटर अंतराने वेंगुर्ले, कोल्हापूर अंतर 55 किलोमीटर अंतराने कमी होणार आहे. हा घाट मार्ग हा शिवकालीन पानंद म्हणून परिचित आहे. वसोली ग्रामपंचायतीत हा मार्ग 26 नंबरला पूर्वीच नोंद आहे.

याच मार्गाने ब्रिटिश काळात वेंगुर्ले बंदरात व्यापार चालत असे. घाटाचे अंतर केवळ साडेचार किलोमीटरचे आहे. घाटाला केवळ एकच वळण लागते आणि एक किलोमीटर अंतराचा रस्ता. अंजीवडेवासीयांनी श्रमदानातून तयार केला आहे. गतसरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या सर्वेक्षणात अंदाजे खर्च 32 कोटी रुपये इतकाच दाखवला आहे. एक मोठे वळण व चार-पाच लहान मोऱ्या निर्धारित केल्या आहेत. ही पानंद शिवकालीन असल्याने वनखात्याने 20 फूट रुंदीचा मार्ग माथ्यापर्यंत झाडे-झुडपे तोडून साफ केला आहे. 

घाटमाथा व तळकोकण जोडणारे जे घाट सध्या आहेत ते पूर्णतः जीर्ण झाले आहेत ते दुरुस्तीसाठी आवाक्‍याबाहेर आहेत. नव्याने उदयाला येत असलेला घोडगे जांभवडे हा 10 किलोमीटर अंतराचा घाट वनखात्याच्या जाचक अटीत सापडला आहे. जांभवडे घोडगे घाटाला लोकांचा अजिबात विरोध नाही. तो त्या बांधवांचा हक्क आहे; मात्र तो करताना केवळ नाममात्र बजेट असलेल्या आंजिवडे घाटाकडे दुर्लक्ष होऊ नये, असे येथील लोकांचे मत आहे. त्यामुळेच लोकांनी आता आंजिवडे घाट निर्मितीसाठी निर्णायक लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

घाट अस्तित्वानंतर फायदे 
सावंतवाडी-कोल्हापूर अंतर 115 किलोमीटर तर वेंगुर्ले- कोल्हापूर 125 किलोमीटर होईल. माणगाव येथील प्रख्यात दत्त मंदिर, टेंबे स्वामी जन्मस्थळ, महादेवाचे केरवडेतील सिद्ध महादेव मंदिर, मोरे येथील स्वप्न नगरी, ऐतिहासिक रांगणा व मनोहर मनसंतोष गड, पाटगाव येथील मौनी महाराजांचा मठ, तांबालेचा महिला साखर कारखाना, गारगोटी येथील मौनी विद्यापीठ, भुदरगड, आदमापुरचा बाळूमामा, वेंगुर्ले बंदर, शिरोडा बंदर, चिपी विमानतळ, झाराप रेल्वे जंक्‍शन आदी असंख्य ठिकाणे व पर्यटनस्थळे जोडली जातील. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com