कोकणसाठी हवे स्वतंत्र विद्यापीठ - भास्कर जाधव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

चिपळूण - सोलापूर, नांदेड, गडचिरोली, जळगावच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली.

चिपळूण - सोलापूर, नांदेड, गडचिरोली, जळगावच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली.

श्री. जाधव म्हणाले,‘‘स्वतंत्र विद्यापीठासाठी कोकणातील सर्व महाविद्यालये सकारात्मक असून शिक्षणप्रेमींकडूनही स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. ७६४ महाविद्यालये संलग्न असलेल्या  मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षमतेविषयी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पेपरफुटीचे अनेक प्रकार, उशिरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र मिळण्यास होत असलेला विलंब आणि परीक्षांच्या ऑनलाईन निकालांमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याने विद्यापीठाची  अक्षरशः बेअब्रू झाली आहे. या सर्व प्रकारांमुळे सध्या मुंबई विद्यापीठात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फटका कोकणातील विद्यार्थ्यांना बसला असून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने मुंबई विद्यापीठाचे विभाजन  करून स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी कोकणातील शिक्षणप्रेमी नागरिक, संस्था आणि विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.’’

रोजगारक्षम अभ्यासक्रम शक्‍य
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील ४५, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८, आणि दक्षिण रायगडमधील २० अशा १०३ महाविद्यालयांकरिता स्वतंत्र कोकण विद्यापीठ  स्थापन करणे शक्‍य आहे. स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास कोकणातील स्थानकांच्या गरजेप्रमाणे सुसंगत असे रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करणे शक्‍य होईल,  असेही जाधव यांनी सभागृहात सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhaskar Jadav demand in Assembly