बाजूपट्ट्या खचल्याने भुईबावडा घाट "डेंजर झोन'मध्ये 

एकनाथ पवार
Thursday, 24 September 2020

घाटरस्ता एप्रिलमध्ये वाहतुकीस बंद केला होता. त्यामुळे पडझड निर्दशनास आलेली नाही.

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : करूळ घाटरस्त्याला पर्यायी भुईबावडा घाटरस्त्याची बाजूपट्टी तीन ठिकाणी खचली आहे. रस्ताही खचण्याचा धोका आहे. कोरोनामुळे गेले काही महिने रस्ता वाहतुकीस बंद होता; परंतु याच आठवड्यात रस्ता खुला केला. खचलेल्या बाजूपट्टीची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. 

खारेपाटण-गगनबावडा राज्यमार्गावरील भुईबावडा घाट करूळ घाटरस्त्याला पर्याय मानला जातो. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो. त्यामुळे एका घाटात दरड कोसळली, तर दुसऱ्या घाटरस्त्याने मार्गक्रमण करता येते. त्यामुळे दोन्ही घाट एकमेकाला पर्याय आहेत; परंतु सध्या भुईबावडा घाट दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. घाटरस्त्याची बाजूपट्टी दोन ते तीन ठिकाणी खचली आहे. घाटात अनेक ठिकाणी किरकोळ पडझड झाली आहे. बाजूपट्टीची पुनर्बांधणी बांधकाम विभागाने वेळेत केली नाही, तर रस्ता देखील खचण्याचा धोका आहे. 

लॉकडाउनमध्ये इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी काही लोक या रस्त्याचा वापर करीत होते. त्यामुळे हा घाटरस्ता एप्रिलमध्ये वाहतुकीस बंद केला होता. त्यामुळे घाटरस्त्याची पडझड निर्दशनास आलेली नाही. याच आठवड्यात येथून पुन्हा वाहतुक सुरू करण्यात आली. भुईबावडा घाटमार्गाला रस्ता खचण्याचा धोका पूर्वीपासून आहे. यापूर्वी तीन चार ठिकाणी रस्ता खचण्याचे प्रकार घडलेले आहेत. दरडीच्या बाजूला पर्यायी एकेरी मार्ग तयार करून बांधकाम विभागाला वाहतूक सुरू करावी लागली होती. 

घाटरस्त्यांच्या दरडीकडील बाजूने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी येत असते. या पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे सुस्थितीत असणे आवश्‍यक असतात; परंतु घाटरस्त्यातील गटारातील गाळच न काढल्यामुळे सर्व पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे रस्त्याची बाजुपट्टी खचणे, रस्ता खचणे, रस्त्याला भगदाड पडणे, असे प्रकार घडतात. 

लहान, लहान भगदाडांकडे दुर्लक्ष 
पावसाचे पाणी झिरपून पडलेल्या लहान लहान भगदाडांकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जाते. या भगदाडांचे रूपांतर रस्ता खचण्यात झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे लघुस्थितीत असलेली भगदाडे वेळीच का बांधली जात नाहीत, असा प्रश्‍न वाहनचालकांमधून विचारला जात आहे. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhuibawada Ghat in "Danger Zone" due to side erosion