
दिवसाढवळ्या गव्यांचा वावर मानवी वस्तीनजीक वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बांदा (सिंधुदुर्ग) : शहरात राममंदिर नजीक शेतातून गुरे घेऊन घरी परतताना शेतकरी सदाशिव सावंत यांचा दोन गव्यांनी भरदिवसा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सावंत यांनी लगबगीने जवळील झाडीचा आसरा घेतल्याने दुर्घटना टळली. दिवसाढवळ्या गव्यांचा वावर मानवी वस्तीनजीक वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांदा-गडगेवाडी येथील शेतकरी सदाशिव सावंत यांची शहरातील राममंदिरनजीक शेतजमीन आहे. ते नियमित गुरांना चारविण्यासाठी या ठिकाणी घेऊन जातात. सकाळी गुरांना घेऊन घरी परतत असताना भर रस्त्यातच त्यांना दोन गव्यांचे दर्शन झाले. सावंत यांनी गव्यांना जंगलात हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यातून गवे बाजूला होत नव्हते. त्यांनी रस्त्यातच ठाण मांडल्याने सावंत यांना घरी परतणे मुश्किल झाले. तब्बल अर्धा तास गवे याठिकाणी होते.
हेही वाचा - अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवासी घाबरले
यावेळी गव्यांना हुसकावून लावताना दोन्ही गव्यांनी सावंत यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने पाठलाग केला. सावंत यांनी प्रसंगावधान दाखवत लागलीच जवळच्या झाडीचा आसरा घेतला, त्यामुळे ते हल्ल्यातून बालंबाल बचावलेत. हा रहदारीचा रस्ता आहे; मात्र गवे याठिकाणी बिनधास्त वावरत होते. सावंत यांनी सांगितले की, त्यांना नेहमीच शेतात ये-जा करताना गव्यांचे दर्शन होते; मात्र आज गव्यांनी पाठलाग केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतीचे अतोनात नुकसान
या परिसरात शेतकऱ्यांनी उन्हाळी कडधान्ये व भाजीपाला पिकविला आहे; मात्र गव्यांनी शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. नुकसानीबरोबरच आता गवे शेतकऱ्यांवर हल्ले करू लागल्याने वन खात्याने गव्यांचा बंदोबस्त करावा व शेती नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा - शिवसेनेचा कोकणातील कारभार भकास ; कोकणवासींयाची नाराजी कायम
संपादन - स्नेहल कदम