
सायकल चालवण्यामुळे आपले आरोग्य तंदुरुस्त राहते. तसेच इंधन न वापरले गेल्यामुळे आपले पैसे वाचतात आणि प्रदूषणसुद्धा कमी होते, पर्यावरण जपले जाते. असे सायकलचे अनेक फायदे असल्यामुळे दापोलीकर आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करत आहेत.
दाभोळ (रत्नागिरी) : सायकल चालवण्यामुळे आपले आरोग्य तंदुरुस्त राहते. तसेच इंधन न वापरले गेल्यामुळे आपले पैसे वाचतात आणि प्रदूषणसुद्धा कमी होते, पर्यावरण जपले जाते. असे सायकलचे अनेक फायदे असल्यामुळे दापोलीकर आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करत आहेत. सायकलप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि सर्वांनी सायकल चालवून आरोग्य जपावे, या जनजागृतीसाठी दापोलीकरांकडून रविवारी (ता. १४) सायकल फेरी काढण्यात येणार आहे. सायकलवर प्रेम करा, हा संदेश देण्यासाठी दापोलीकर व्हॅलेंटाइन डे निमित्ताने रविवारी (ता. १४) सायकल फेरी काढणार आहेत. त्यात ‘हळू सायकल’ स्पर्धेचेही आयोजन केले आहे.
ही सायकल फेरी दापोली शहरातील आझाद मैदान-वडाचा कोंड-जालगाव ग्रामपंचायत-जालगाव बाजारपेठ- गव्हे-आझाद मैदान या मार्गावर आयोजित केली गेली आहे. सायकल फेरीचे अंतर ८ किमी असून त्यासाठी सकाळी ७.३० वा. आझाद मैदानात जमायचे आहे. तेथे सायकल फेरी मार्गाबद्दल सूचना देण्यात येतील आणि सायकल फेरीला सुरवात होईल. सायकल फेरीमध्ये सायकल सावकाश, कमी वेगाने चालवल्या जातील. यामध्ये दापोलीकरांनी आपल्या मुलांना आणि नातवंडांना घेऊन सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सायकल फेरीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही; मात्र मास्क लावणे गरजेचे आहे. सायकल फेरी झाल्यावर ९ वाजता आझाद मैदानात १०० मीटर अंतराची हळू सायकल स्पर्धा लहान वयोगट व खुला गट अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे हा प्रेम दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतात पूर्वीपासून रक्षाबंधन, पाडवा, भाऊबीज, मकर संक्रांत, वटपौर्णिमा, ईद असे अनेक सण साजरे केले जातात.
दापोलीमध्येही सगळे सण आनंदाने साजरे होतात. दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण, त्यापासून शरीरासोबत पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याबद्दलही नागरिकांनी अधिक जागरूक व्हावे, पर्यावरण रक्षणात आपले योगदान द्यावे, आरोग्य तंदुरुस्त राखावे, यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे.
संपादन - अर्चना बनगे