देवगडात पर्यटनाला मोठा फटका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

कोरोनामुळे विविध उद्योग, व्यवसाय अडचणीत येण्याबरोबरच सर्वच पातळीवर हमखास आर्थिक लाभ मिळवून देणारा पर्यटन व्यवसायही संकटात सापडला. यामुळे हॉटेल व्यवसायाबरोबरच पूरक व्यवसाय आणि रोजगारलाही मोठा फटका बसला.

देवगड ( सिंधुदुर्ग ) - कोरोनामुळे विविध उद्योग, व्यवसाय अडचणीत येण्याबरोबरच सर्वच पातळीवर हमखास आर्थिक लाभ मिळवून देणारा पर्यटन व्यवसायही संकटात सापडला. यामुळे हॉटेल व्यवसायाबरोबरच पूरक व्यवसाय आणि रोजगारलाही मोठा फटका बसला. भविष्यात परिस्थिती सावरली तरी पर्यटन व्यवसायाला उभारी घेण्यामध्ये काही कालावधी जाईल. भविष्यात हॉटेलसारखी गर्दीची ठिकाणे टाळून घरगुती पाहुणचाराला पर्यटकांकडून अधिक पसंती मिळेल अशीही शक्‍यता आहे. 

कोकणातील गडकिल्ले आणि स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांच्या नेहमीच अजंठ्यावर असतात. अलीकडे गोव्याप्रमाणे सिंधुुदुर्गातही पर्यटन बहरू लागले आहे. साधारणतः वेंगुर्ले ते गणपतीपुळे असा पर्यटकांचा सागरी प्रवास ठरलेला. यामध्ये येणारे समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, प्राचिन मंदिरे पाहण्याबरोबरच खास कोकणी पदार्थांचा आस्वाद घेण्यावर पर्यटकांचा भर असतो. दरवर्षी उन्हाळ्यात पर्यटन हंगामाला चांगलाच जोर चढतो. यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेलेले असतानाच हॉटेल व्यवसायही तेजीत असतो.

यामुळे स्थानिक पातळीवर आंबा, फणस, काजू, कोकम, कुळीथपीठ यांनाही पर्यटकांकडून खास मागणी राहिल्याने स्थानिक पातळीवर मोठी आर्थिक उलाढाल होते. पर्यटनामुळे हॉटेल, छोट्यामोठ्या उद्योगांना उभारी मिळण्याबरोबरच निवास न्याहारीसह अन्य व्यवसायाच्या माध्यमातून घराघरात आर्थिक स्त्रोत येतो; मात्र कोरोना आणि पर्यायाने झालेल्या लॉकडाउनमुळे ऐन हंगामातच पर्यटन व्यवसायाचे कंबरडे मोडले.

किनारे सुनेसुने झाले. अनेकांना आपले आगावू बेत रद्द करण्याची नामुष्की ओढवली. भविष्यात कोरोना संपला तरी पर्यटन व्यवसायाची घडी बसण्यास विलंब जाईल अशी शक्‍यता आहे. शिवाय पुढील काही काळात मोठ्या गर्दीच्या ठिकाणापेक्षा घरगती पाहुणचाराला अधिक पसंती असेल. अर्थात यामध्ये स्वच्छतेला अधिक महत्व राहणार आहे. पर्यटकांची रेलचेल थांबल्याने विविध व्यवसाय कोंडीत सापडले. त्यामुळे ऐन हंगामातील कोलमडलेले पर्यटन आर्थिक उलाढालीसाठी मारक ठरेल. 

""लॉकडाऊनमुळे पर्यटनावर परिणाम झाला असला तरी तो तात्पुरता असेल. उलट प्राप्त परिस्थितीमध्ये निवास न्याहारी पर्यटनाला मोठी संधी निर्माण होणार आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन बाजूला सारून घरगुती पर्यटनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे. नवीन पर्यटनस्थळे, नवीन पायाभूत सुविधा यातून विकसित होतील.'' 
- डॉ. सुनील आठवले, पर्यटन अभ्यासक 

""लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत येण्याबरोबरच त्यावर अवलंबून असलेली कुटुंबे संकटात सापडली. रोजगार थांबल्याने लोकांची आर्थिक कुचंबना झाली. हॉटेल व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला. शिल्लक माल खराब होण्याच्या भितीने वाटून टाकावा लागला. यंदाचा हंगाम वाया गेलाच पण कोरोना पूर्णपणे नष्ट होईपर्यंत पर्यटन हंगाम बहरणे अशक्‍य आहे. त्यासाठी शासनाने व्यावसायिकांना मदतीचा हात द्यावा.'' 
- प्रफुल्ल भावे, हॉटेल प्रपंच, देवगड 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Big Blow To Tourism In Devgad Sindhudurg Marathi News