हापूसच्या गोडव्याची पावसावर भिस्त

हापूसच्या गोडव्याची पावसावर भिस्त

सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास बागायतदारांच्या आर्थिक स्थितीतही चांगली भर पडणार आहे. सर्वसामान्यांना माफक दरात देवगड हापूस मिळण्याबरोबरच प्रक्रिया उद्योगालासुद्धा पुरेसा कच्चा माल उपलब्ध होऊ शकणार आहे. अर्थात, वादळी पाऊस आला तर मात्र हापूसचे हे सुखद स्वप्न भंगण्याची भीती आहे. 

यंदाचा हापूस हंगाम उत्तम आहे. अखेरच्या टप्प्यात आंबा मुबलक प्रमाणात आहे. अजून हापूसचे दर टिकून आहेत. कॅनिंगचेही दर स्थिर आहेत. यंदा अखेरच्या टप्प्यातील मुबलक आंब्यामुळे प्रक्रिया व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात आंबा वळेल. त्यामुळे प्रक्रिया उद्योग तेजीत जातील; मात्र वातावरणाची साथ हवी. 
- श्रीधर ओगले, 

आंबा बागायतदार आणि 
प्रक्रिया उद्योजक, दहिबाव

‘जीआय’साठीही लगबग
सिंधुदुर्गसह कोकणातील पाच जिल्ह्यांत तयार होणारा आंबा ‘हापूस’ म्हणून ओळखला जाईल. अलीकडेच शेतकरी तसेच आंब्याशी संलग्न व्यावसायिकांना हापूस नावाने भौगोलिक निर्देशन प्रमाणपत्र देण्याचे अधिकार कोकणातील चार संस्थांना प्राप्त झाले असून त्यामध्ये येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचा समावेश आहे. आंबा उत्पादक बागायतदार, रोपवाटिका व्यावसायिक, निर्यातदार, पुरवठा साखळीतील इतर सहव्यावसायिक यांना भौगोलिक निर्देशन हापूस (अल्फान्सो) प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहील.

आतापर्यंत सुमारे २१ जणांना टॅग क्रमांक मिळाले असून अजून सुमारे १० जण प्रक्रियेत आहेत. भौगोलिक निर्देशन हापूस (अल्फान्सो) प्रमाणपत्रासाठीची आवश्‍यक कागदपत्रे चेन्नई येथे पाठवली जातात. तेथे त्यावर आवश्‍यक सोपस्कार होऊन अर्जदारास ऑनलाईन  टॅग क्रमांक दिसतो. 

टपालाने प्रमाणपत्र येण्यास काही दिवस जात असले तरी ऑनलाईन टॅग क्रमांकामुळे त्यांचे पुढील काम सुरू होते. शेतकरी, प्रक्रिया, विक्री, वितरक अशा विविध मंडळीना प्रमाणपत्र मिळते. हापूस मानांकनामुळे हापूस नावाखाली विक्री होणाऱ्या अनेक ठिकाणच्या आंब्याला आळा बसेल. यामुळे संभाव्य फसवणुकीवर निर्बंध येऊन ग्राहकांनाही अस्सल हापूसची चव नव्याने कळेल.

कोकणची मक्तेदारी

देखणे, टिकाऊ आणि अवीट गोडीचे फळ असल्याने हापूसची लोकप्रियता जगभरात आहे. अल्फान्सो अर्थात हापूस ही कोकणची मक्तेदारी. त्यातही देवगड हापूस, रत्नागिरी हापूस यांची वेगळी ओळख आहे. प्रचंड निर्यातमूल्य असलेले हे फळ मूळचे कोकणचे नाही. ते कोकणापर्यंत पोचविण्याचे श्रेय एका समुद्रात चाचेगिरी करणाऱ्याला जाते. अल्फान्सो नावाचा हा प्रवासादरम्यान एका बेटावर थांबला होता. तेथे त्याला अवीट गोडीच्या फळाचे झाड आढळले. त्याने फळे तोडून आणली. तो गोवा, कोकणच्या दरम्यान पुढच्या मुक्कामाला होता. त्याने फळे खाऊन कोय येथेच टाकली. त्यातूनच कोकणच्या भूमीत हापूसचे आगमन झाले. 

‘हापूस’चा व्याप

देशात आंब्याची लागवड सुमारे १.६० दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रावर आहे. सुमारे १० दशलक्ष टन इतके आंब्याचे उत्पादन होत आहे. जगातील सुमारे ४२ टक्‍के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. त्यातील महाराष्ट्रात सुमारे ३.५० लाख हेक्‍टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे. त्यापासून ५.२ लाख टन इतके उत्पन्न मिळते. कोकणात हापूस जातीचे आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सिंधुदुर्गात सुमारे २३ हजार ७६४.४९ हेक्‍टर क्षेत्रावर आंबा लागवड केली आहे. सिंधुदुर्गात वार्षिक सुमारे ७० ते ८० हजार मेट्रिक टन उत्पादन होते. सुमारे ६५ टक्‍के म्हणजेच ४५ ते ५० हजार टन आंबा उत्पादन एकट्या देवगड तालुक्‍यातून होत असते.

अशी आहे सद्यःस्थिती
असंख्य खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या ‘देवगड हापूस’चा स्थानिक बाजारातील अजूनही दर स्थिर आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा संपल्यानंतर मध्यंतरीचे उत्पादन थोडे मंदावल्याने बाजारातील आंब्याची आवक थोडी कमी झाली असली तरी आता अखेरच्या टप्प्यात आंब्याचे प्रमाण अधिक असल्याने दराची घसरण होऊन सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखता येईल. अखेरच्या टप्प्यात आंबा मुबलक असल्याने खवय्यांनी थोडा धीर धरायला हरकत नाही.

पहिला टप्पा नुकसानीचा
निसर्गाचे बदलते रूप, कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे सुरवातीचे जादा उत्पन्न मिळवून देणारे आंबा उत्पादन शेतकऱ्यांच्या हातून काही प्रमाणात निसटले. सुरवातीला झाडांना मोहोराचे प्रमाण बऱ्यापैकी दिसत असले तरी त्यातून अपेक्षित फलधारणा झाली नाही. पहिल्या टप्प्यातील आंबा फळबाजारात पोचला मात्र दुसऱ्या टप्यातील आंब्याचे प्रमाण काही भागात कमी अधिक प्रमाणात राहून सध्या आवक मंदावल्याने दर सध्या स्थिर आहेत.

वातावरणाची धास्ती
ढगाळ वातावरण, वादळी पावसाची शक्‍यता यामुळे बागायतदार ‘रिस्क’ घेत नाहीत. तयार आंबा झटपट झाडावरून उतरवण्याची सध्या धांदल सुरू आहे. त्यातून प्रतवारी करून उरलेला आंबा कॅनिंगला दिला जात आहे. कोकणात जोराचा पाऊस झाल्यास फळबाजारातील दराची घसरण होते. अशावेळी स्थानिक बाजारातील दरही खाली येतात असा बागायतदारांचा अनुभव आहे. मात्र पावसाची अवकृपा होता कामा नये.  

बाजारपेठेचा विस्तार
एकेकाळी वाशी फळबाजारावर अवलंबून असलेला आंबा आता नागपूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बेळगाव, नाशिक, गोवा आदी बाजारात जात आहे. बागायतदार स्वतः विक्री स्टॉल लावून प्रमुख शहरांत आंबा विकत असल्याने हापूसची व्याप्ती वाढत आहे. याशिवाय वाशी फळबाजाराप्रमाणेच पुणेसह अन्य शहरात येथून रोज आंबा रवाना होत आहे. यासाठी खास वाहतूक सेवा आहेत. यामध्ये भेट पार्सल पाठवण्याबरोबरच शेतकरी ते ग्राहक असे नाते वृद्धिंगत होताना दिसत आहे. काही ग्राहक थेट बागायतदाराशी जोडले गेल्याने ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून हापूसची उलाढाल वाढत आहे.

पावसाचा दिलासा हवा
‘हापूस’चे दरवर्षी नवे स्वरूप, नवा ढंग असेच चित्र अनुभवायला मिळते. सुरवातीला निसर्गाने फटकारले असले तरी आता त्याची भरपाई होण्याची शक्‍यता असून पावसाने दिलासा दिल्यास बागायतदारांच्या हाती सारा आंबा येऊन आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. सध्या आंबा कॅनिंग व्यवसाय तेजीत असून मोठी उलाढाल सुरू आहे.

प्रक्रिया उद्योगाला तेजी
यंदा अखेरच्या टप्प्यातील आंब्याचे प्रमाण अधिक असल्याने प्रक्रिया उद्योगाकडे मोठ्या प्रमाणात आंबा वळेल असे चित्र आहे. त्यामुळे प्रक्रिया उत्पादनाला पुरेसा आंबा मिळाल्यास आंब्याशी निगडित असलेले अनेक पूरक व्यवसाय तेजीत जाण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com