रत्नागिरीतील ही जैवविविधता अचंबित करणारी 

Biodiversity In Ratnagiri Pratik More Article
Biodiversity In Ratnagiri Pratik More Article

1992 सालात रत्नागिरी शहराच्या किनारी भागातली 200 हेक्‍टर जमीन एमआयडीसीने स्टरलाईटला कॉपर स्मेल्टींग प्लॅन्ट उभारण्यासाठी दिली. मात्र कंपनीने इथून आपला गाशा गुंडाळला. यानंतरही जागा पडूनच आहे. या जागेत एक इको सिस्टम विकसित झाली आहे. येथील जैवविविधतेचा अभ्यास लेन्स आर्टकडून सुरू आहे. शिवाय चित्रीकरणही. कासच्या पठाराशी स्पर्धा करील अशी जैवविविधता असलेला हा प्रदेश औद्योगिकीकरणासाठी देताना तेथील निसर्गसंपत्ती राखून ठेवली पाहिजे. 

चंपक मैदानाची भौगोलिक रचना म्हणजे कातळाचे सपाट मैदान. अधेमध्ये असलेली पाणथळ तळी आणि विस्तीर्ण गवताळ कुरणे. एका बाजूला कचरा डंपिंग ग्राउंड बाकी सगळ्या जागा झुडपी जंगलाने आणि गवताने वेढलेल्या. दरवर्षीच्या पावसामध्ये इथे कातळ फुलं मोठ्या प्रमाणावर उगवतात आणि तळ्यांमध्ये स्थलांतरित पक्षीही येतात. अशा प्रकारे एक परिपूर्ण इकोसिस्टीम काही वर्षात इथे तयार झाली. 

मुख्यमंत्र्यांनी या जागेवर मरीन पार्क किंवा मॅंगो पार्क उभे करण्याची घोषणा केली आहे. गेली काही वर्ष रत्नागिरीतील लेन्स आर्ट हा ग्रुप चंपक मैदान आणि सभोवतालचा परिसर इथे जैव विविधतेचे चित्रण करत आहे. रत्नागिरीमधला कोल्हापूर हायवे जिथून सुरू होतो तिथे आपण पोचलो की समोर येतो तो हा चंपक मैदानाचा परिसर. साध्या नजरेला ही कातळ जमीन उजाड आणि वैराण वाटते.

सुकलेले गवत, आटलेलं पाणी आणि भाजणाऱ्या उन्हाच्या झळा अशा तप्त वातावरणात वर्षा ऋतूची चाहूल लागते आणि पहिल्या सरी या कातळावर बरसतात. इथूनच सुरवात होते, एका रुपांतरणाला. सीतेची आसव, आषाढ हबेआमरी, दीपकाडी या वनस्पती प्रकट होतात. जांभळा, पांढरा, गुलाबी रंगाची उधळण करत कातळ पठार अचानक रंगीबेरंगी गालीच्यामध्ये रुपांतरित होतं. तुतारी, सोनकी, कुर्डू, भारंगी, तेरडा अशा एकाहून एक वनस्पती आणि त्यांची रंगीबेरंगी फुलं पाहण्यात मन हरकून जातं. 

कासच्या पठाराशी स्पर्धा करेल एवढ्या जाती इथं आढळतात, मग स्थलांतरित पक्षी लेसर व्हिस्टलींग डक्‍स, टील आणि पिंटेल यासारखी बदकं, चातक पावश्‍यासारखे ककू इथं दिसू लागतात. घारी, गाय, बगळे, करकोचे, टीटव्या, ल्हावे, वेडा राघू इथले कायमचे रहिवासी. कोतवाल मैना, पोपट, मोर खाटीक सहज दिसतात. श्रावणमासी तर इथली हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलं यांचं कॉम्बिनेशन अचंबित करणारं असतं.

गवत वाढायला लागलं, की मग हॅरियर ईगल आणि ससाणे इथे घिरट्या घालू लागतात. गेल्या काही वर्षात रेड नेकड फाल्कन, शाहीन फाल्कन, पेरिग्रिन फाल्कन, अमुर फाल्कन इथे आढळून आलेत. स्नाईप प्लोवरसारखे किनारी पक्षीपण आपली हजेरी लावतात. असे 90 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी, किमान 40 प्रकारची कातळ फुलं, कोल्हे, साळिंदरसारखे प्राणी, फुलपाखरांच्या 30 एक प्रजाती इथे आढळल्याची नोंद आहे. ही जैवविविधता नष्ट न करता मार्ग काढला पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com