महाविकास आघाडीतील २२ नगरसेवकांच्या आत्मदहनाच्या धमक्‍या पोकळच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

आत्मदहन करण्याचा इशारा देणे म्हणजे एकप्रकारे जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला ब्लॅकमेलिंग करण्यासारखेच आहे.

चिपळूण (रत्नागिरी) : महाविकास आघाडीतील २२ नगरसेवकांच्या आत्मदहनाच्या पोकळ धमक्‍या आहेत. आत्मदहन करण्याचा इशारा देणे म्हणजे एकप्रकारे जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला ब्लॅकमेलिंग करण्यासारखेच आहे. कितीही चौकशा समित्या नेमा. सत्य आमच्या बाजूनेच आहे. परंतु, शहरात विकासाची कामे रखडली आहेत. त्याला महाविकास आघाडीच जबाबदार आहे, अशी माहिती भाजपचे शहरप्रमुख आशिष खातू यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

काँग्रेसचे नगरसेवक सुधीर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावर टीका केली. या पार्श्‍वभूमीवर शिंदे म्हणाले, नगरसेवक सुधीर शिंदे यांची पत्रकार परिषद म्हणजे फुल कॉमेडी शो आहे.

हेही वाचा - अर्ध्या पोटावर, काम पु्र्णवेळ अन् वेतन मात्र अर्धेच ?
 

मनोरंजनापलीकडे त्यांच्या पत्रकार परिषदेतून काहीच साध्य होत नाही. त्यांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या कामाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू समजून घेऊन आणि नियमाचा आधार घेत चौकशी केली आहे. अजून चौकशी पूर्ण झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी जे निर्णय घेतले आम्ही त्याचे स्वागतच केले आहे. सुधीर शिंदे यांना अपयश डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे ते बेताल बोलत आहेत. 

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे काम भाजपच्या काळात पूर्ण झाले. पूर्वी अर्धवट असलेल्या कामाला नगराध्यक्षा खेराडे यांनी गती दिली. हे काम मुद्दाम रखडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनांचे शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालन करायला हवे; मात्र तसेही होताना दिसत नाही. तरीही पुढील दोन महिन्यात सांस्कृतिक केंद्र सुरू होईल. शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामात कोणताही भ्रष्टाचार किंवा मनमानी झालेली नाही. त्याबाबत सभागृहात एकमताने ठराव झाला आहे. महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे वाणीआळी आणि भैरी मंदिर परिसरातील रस्ते दुरुस्ती रखडली आहे. ती होणे गरजेचे आहे.

हेही वाचा -  शिवसेना आमदार जाधव यांच्या प्रश्नाला ठेकेदार मात्र निरुत्तर
 

भोजने भाजप, आमच्यापासून दूर गेलेले नाहीत

उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांनी नव्या व्यवसायाला सुरवात केली आहे. ते व्यवसायात जम बसविण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे ते आमच्याबरोबर दिसत नाहीत. परंतु, भोजने भाजप आणि आमच्यापासून दूर गेलेले नाहीत. ते आमच्या संपर्कात आहेत. त्यांना विश्‍वासात घेऊनच पालिकेत भाजपची वाटचाल सुरू असल्याचे खातू यांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP ashish khatu criticized on the maha vikas aghadi 22 corporators in ratnagiri