बांदा-दोडामार्ग रस्ता भाजपने रोखला 

bjp blocked banda-dodamarg road sindhudurg district
bjp blocked banda-dodamarg road sindhudurg district

बांदा (सिंधुदुर्ग) - वेळोवेळी आंदोलने करूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत केवळ आश्‍वासनेच दिल्याने आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी आक्रमक होत गडगेवाडी येथे बांदा-दोडामार्ग मार्ग तब्बल दोन तास रोखून धरला. एक मार्चपर्यंत रस्त्याच्या कामाची निविदा न निघाल्यास पालकमंत्री आणि शिवसेनेच्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुकाप्रमुखांची प्रतीकात्मक तिरडी यात्रा काढण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दिला. 

प्रशासनाकडे निधी नसल्याचे अभियंता चव्हाण यांनी सांगितल्याने येत्या रविवारी (ता. 7) भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा सरपंच अक्रम खान यांनी दिला. बांधकाम खात्याचे उपअभियंता विजय चव्हाण यांनी रास्ता कामाची 1 मार्चपर्यंत निविदा काढण्याचे आश्‍वासन दिल्यावर रास्ता रोको मागे घेण्यात आला. 

रस्त्याची दयनीय स्थिती असून, वाहतुकीस पूर्ण धोकादायक आहे. रस्त्याच्या कामासाठी भाजपने आतापर्यंत पाच आंदोलने केली. बांधकाम खात्याने प्रत्येक वेळी आश्‍वासन दिले. सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याने पालकमंत्र्यांची प्रतीकात्मक तिरडी यात्रा काढण्याचा इशारा दिला होता. त्याला शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ व दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी दाखवाच, असे प्रत्युत्तर दिले होते. या पार्श्‍वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत आज पूर्वकल्पना न देता बांदा-गडगेवाडी येथे रास्ता रोको केला. या मार्गावरील विविध गावांतील शेकडो ग्रामस्थ आंदोलनात उतरले होते. तब्बल दोन तास वाहतूक रोखून धरल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा होत्या. 

जिल्हा परिषदेच्या सदस्या श्‍वेता कोरगावकर, पंचायत समितीच्या उपसभापती शीतल राऊळ, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, माजी सरपंच बाळा आकेरकर, सदस्य मकरंद तोरसकर, विनोद राऊळ, गुरू सावंत, अमित परब, विकी कदम, दादू कविटकर, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, शेर्ले सरपंच उदय धुरी, मधू देसाई, समीर कल्याणकर, शहराध्यक्ष राजा सावंत, महिला शहराध्यक्षा अवंती पंडित, माजी सरपंच गुरुदास धारगळकर, अमोल सावंत, ऋषी हरमलकर, गौरी सावंत, गोविंद सावंत, गुलजार खान आदींसह शेकडो ग्रामस्थ सहभागी होते. 

दुपारी चारच्या सुमारास भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनास सुरवात केली. याची माहिती मिळताच बांदा पोलिस निरीक्षक अनिल जाधव फौजफाट्यासह दाखल झाले. बांधकाम विभागाचे अभियंता येत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असे खान यांनी सांगितले. उपअभियंता चव्हाण आंदोलनस्थळी आले. सुरवातीला ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. महिलांनी तर समस्यांचा पाढा वाचला. रस्ता करीत नाहीत, तोपर्यंत खनिज वाहतूक बंद करा, अशी मागणी करण्यात आली.

खनिज वाहतूक बंद करण्यासंदर्भात "आरटीओ'ला पत्र दिल्याचे अभियंता चव्हाण यांनी सांगितले. रस्त्याची निविदा प्रक्रिया अद्याप झाली नसल्याने मार्चनंतर या रस्त्याचे काम प्राधान्याने करू, असे आश्‍वासन चव्हाण यांनी दिल्यावर ग्रामस्थ आक्रमक झाले. नाडकर्णी यांनी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या वेळी त्यांनी रस्त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण दिले. त्यावर नाडकर्णी यांनी भीक मांगो आंदोलन करून निधी देतो, असे सुनावले. 

सावंतवाडी तहसीलदारांनी मार्ग बदलला 
सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे दोडामार्ग येथून सावंतवाडी येथे जात होते. त्यांनाही रास्ता रोकोचा फटका बसला. त्यांनी माघारी परतत दुसऱ्या मार्गाने सावंतवाडी गाठली. 

पालकमंत्री, प्रशासन निष्क्रिय 
रस्त्याच्या दुरवस्थेसाठी पालकमंत्री जबाबदार आहेत. महाविकास आघाडी शासन निष्क्रिय आहे. प्रशासन या रस्त्यावर बळींची वाट पाहत असल्याचा आरोप अक्रम खान यांनी केला. जीवन प्राधिकरण व एका खासगी मोबाईल कंपनीच्या केबलसाठी दुतर्फा खोदाई केली आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे, असा आरोपही त्यांनी केला. 
 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com