'राणेजी, भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही, दिल्लीतून ठरतो'

'राणेजी, भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही, दिल्लीतून ठरतो'

कणकवली - भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही; तर दिल्लीतून ठरतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतात. कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच खासदार नारायण राणेंनाही कुणाची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे स्पष्ट केले. 

येथील भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी प्रदेश चिटणीस राजन तेली, युवा नेते अतुल रावराणे, विजय केनवडेकर, संदेश सावंत - पटेल आदी उपस्थित होते. 

श्री. जठार म्हणाले, ""खासदार नारायण राणे यांनी काल (ता.17) कणकवलीत नीतेश राणे हे कमळ निशाणीवरून लढतील असे जाहीर केले; मात्र उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार त्यांना नाही. कणकवली विधानसभा जागेसाठी अनेक मंडळी इच्छुक आहेत. त्यात आता नीतेश राणेंचे एक नाव वाढले; पण उमेदवारी कुणाला द्यायचा याचा निर्णय पक्षपातळीवर होईल.'' 

ते म्हणाले, ""खासदार राणे अजून भाजपमध्ये आलेले नाहीत. त्यांचा पक्षप्रवेशाचाही कार्यक्रम ठरलेला नाही. त्यामुळे कणकवली मतदार संघात त्यांनी नीतेश राणेंना जाहीर केलेली उमेदवारी हे त्यांचे मत आहे. भाजपने अद्याप कुणाला उमेदवारी द्यायचा याचा निर्णय घेतलेला नाही. पक्षाची वरिष्ठ मंडळीच त्याबाबतचा निर्णय घेतील. 

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विलंब झाल्याने ते कणकवलीतील सभेत कोकणच्या विकासाबाबत घोषणा करू शकले नाहीत; मात्र कोकण पर्यटन समितीसाठी 1 हजार कोटींची तरतूद आणि होम स्टे योजनेसाठी 500 कोटींची तरतूद करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प होण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. नाणार प्रकल्प सुरू झाल्यानंतर एक लाख जणांना रोजगार मिळेल आणि कोकणात समृद्धी येईल.'' 

राणेंनी आधी नाणारला पाठिंबा जाहीर करावा 
भाजप प्रवेशाची घाई झालेल्या खासदार राणे यांनी आधी पक्षाची भूमिका आणि ध्येय धोरणे माहिती करून घ्यावीत. तसेच राजकीय विषय बाजूला ठेवून रोजगाराच्या मुद्दयावर त्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा जाहीर करावा म्हणजे राणेंच्या भाजप प्रवेशासाठी आम्ही देखील हिरिरीने बाजू मांडू असे श्री.जठार म्हणाले. 

कोअरकमिटी घेणार राणेंच्या प्रवेशावर निर्णय 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आज रत्नागिरीत चर्चा केली. याचर्चेत राणेंच्या प्रवेशाचाही मुद्दा चर्चला आला. या विषयावर बोलताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी, राणे हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपची कोअर कमिटी निर्णय घेईल आणि कोअर कमिटीमध्ये जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य करावा लागेल असे सांगितल्याचे श्री. जठार म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com