राणे यांना पनवती म्हणणे अयोग्य

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 December 2019

आज शिवसेनेने आमच्याशी काडीमोड घेतल्याने ते केंद्रात आणि राज्यातही भाजपच्या विरोधात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील केंद्रस्तरावरील सर्व कामाचा आढावा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे घेणार आहेत.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - एका खासदाराने सहकारी खासदारावर टिका जरूर करावी; मात्र ती करताना पातळी सांभाळावी, असा सल्ला भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊत यांना आज येथे दिला. केंद्रातील कामांचा आढावा घेण्यास भाजप सक्षम असुन राऊत आमच्या विरोधात असल्याने त्यांनी आंदोलनाची भुमिका घ्यावी, असेही श्री. जठार म्हणाले. 

माडखोल धरण येथील सावंत फॉर्म हाऊस येथे आयोतिज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजन तेली, पालिका भाजपाचे उमेदवार संजू परब, दादू कविटकर आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, ""खासदार विनायक राऊत यांनी आपलेच सहकारी खासदार असलेल्या राणे यांना पनवती म्हणणे योग्य नाही. ते त्यांना शोभत नाही. खासदार राऊत हे युतीचे खासदार होते; मात्र आज शिवसेनेने आमच्याशी काडीमोड घेतल्याने ते केंद्रात आणि राज्यातही भाजपच्या विरोधात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील केंद्रस्तरावरील सर्व कामाचा आढावा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे घेणार आहेत. याच पार्श्‍वभुमिवर येत्या 16 ते 18 तारखेला नारायण राणे यांचा जिल्हा दौरा होत असुन यावेळी आठही तालुक्‍यातील केंद्र सरकारच्या योजना व कामासंबंधी सुचना व तक्रारी लेखी स्वरूपात घेणार आहेत. यामध्ये बीएसएनएल, कोकण रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, चिपी विमानतळ, सीआरझेड, वनविभाग, पर्यटन, पर्यावरण, मच्छीमार, शेतकरी आदींचे प्रश्‍न त्या त्या संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेऊन सोडविणार आहेत. यावेळी सर्व तालुक्‍यातील कार्यकर्त्याशी जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.'' 

हेही वाचा - महाविकास आघाडीला कशामुळे लागला रत्नागिरीत ब्रेक ? 

श्री. जठार पुढे म्हणाले, ""जनादेशाची चोरी करून बसलेल्या सरकारचे नागपुर अधिवेशन येत्या 16 तारीख पासुन सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी पुर्ण मंत्रालय नागपुर येथे हलवावे लागते. यासाठी येणारा खर्च हा शंभर कोटीच्या घरात असतो; मात्र सरकारमध्ये खातेवाटप झालेले नसतांना लोकांच्या प्रश्‍नाला उत्तरे देण्यासाठी मंत्री नाही, उत्तरे मिळणार नाही, असे असतांना होणारे हे अधिवेशन म्हणजे लोकांच्या पैशाची लुट आहे.'' 

कोरगावकर अर्ज मागे घेणार 

सावंतवाडी पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपाच्या अन्नपुर्णा कोरगावकर यांच्याबाबत श्री. जठार म्हणाले, ""उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या तारीखपर्यत त्या आपला अर्ज मागे घेतील. तसा विश्‍वास आहे. त्यांनी मला तसे वचन दिले होते व ते वचन त्या पाळतील.'' 

हेही वाचा - भाजपने राखला सिंधुदुर्गातील हा गड 

कोकिसरे पुलाला मंजूरी 

कोकिसरे येथील रेल्वे फाटक येथील अंडरग्राऊड पुलाला केंद्राकडून मंजूरी मिळाली असुन तब्बल विस कोटी रूपये खर्च करून हे पुल उभारण्यात येणार आहे. मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून हे पुल होत असुन लोकांना होणारा त्रास यापुढे थांबणार आहे, असेही जठार म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP District President Pramod Jathar Comment On Vinayak Raut