भाजपने राखला सिंधुदुर्गातील 'हा' गड

BJP Wins Banda Grampanchayat In Sindhudurg
BJP Wins Banda Grampanchayat In Sindhudurg

बांदा ( सिंधुदुर्ग )  - जिल्ह्याचे लक्ष असलेल्या बांदा सरपंच पोटनिवडणुकीत भाजपने गड राखण्यात यश मिळविले आहे. दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपचे अक्रम खान यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मकरंद तोरसकर यांचा 813 मतांनी एकतर्फी पराभव केला. गेली 23 वर्षे एकहाती सत्ता असलेल्या भाजपला बांदावासीयांनी पुन्हा साथ दिल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले. 

अंतिम फेरीत खान यांना 73 मतांचे मताधिक्‍य

सरपंच मंदार कल्याणकर यांनी राजीनामा दिल्याने बांदावासीयांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागले होते. भाजपचे अक्रम खान यांना 2 हजार 161 मते, महाविकास आघाडीचे मकरंद तोरसकर यांना 1 हजार 348 मते तर अपक्ष उमेदवार साईप्रसाद कल्याणकर यांना 115 मते मिळाली. 30 मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला. बांदा शहर हे भाजपचा गेली 23 वर्षे बालेकिल्ला असल्याने शिवसेनेने सरपंचपद ताब्यात घेण्यासाठी सर्व राजकीय शक्ती पणाला लावली होती. दोन्ही पक्षांकडून दिग्गज नेते प्रचारासाठी रिंगणात उतरले होते. 
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार राजाराम म्हात्रे व निवडणूक निर्णय अधिकारी गणपत लोंढे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीच्या 7 फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीतच खान यांनी 80 चे मताधिक्‍य घेतले. पुढील प्रत्येक फेरीत खान यांचे मताधिक्‍य वाढत गेले. खान यांनी आपल्या प्रभागात 317 चे मताधिक्‍य घेतले. अंतिम फेरीत खान यांनी 73 चे मताधिक्‍य घेत एकूण 813 मतांनी विजय मिळविला.

विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

खान यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या वेळी भाजपचे नेते संजू परब, जिल्हा बॅंक संचालक प्रमोद कामत, जिल्हा परिषद सदस्य श्‍वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, तालुकाध्यक्ष महेश सारंग, शहराध्यक्ष राजा सावंत आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिष्ठेची निवडणूक असल्याने तहसीलदार कार्यालयात कडक पोलीस बंदोबस्त होता. विजयानंतर खान यांनी बांद्यात येऊन श्री देव बांदेश्‍वराचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर शहरातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांच्या आतिषबाजीत व ढोल-ताशांच्या गजरात भव्य विजयी मिरवणूक काढली. यावेळी विजयाच्या घोषणा दिल्या. खान यांनी शहरातील मतदारांचे आभार मानले. 


सरपंच पोटनिवडणुकीत बांदावासीयांनी जातीच्या राजकारणाला थारा न देता माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजातील उमेदवाराला भरघोस मताधिक्‍क्‍याने निवडून दिल्याने हा विजय बांदा शहरवासीयांना व नेते नारायण राणे यांना समर्पित करतो. सर्वांना एकत्रित घेऊन बांदा शहराचा विकास साधायचा असून बांद्याला जिल्ह्यातील आदर्श शहर म्हणून नावारूपास आणायचे आहे. 
- अक्रम खान, नूतन सरपंच 

 

एकूण मते 
- अक्रम खान ः 2161 
- मकरंद तोरसकर- 1348 
- साईप्रसाद कल्याणकर ः 115 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com