रत्नागिरीत आठ मंदिरांसमोर भाजपने केला घंटानाद

मकरंद पटवर्धन
Saturday, 29 August 2020

‘दार उघड, उद्धवा दार उघड’असा गजर आणि घंटानाद करत भाजपने दक्षिण रत्नागिरीतील मंदिरांबाहेर अनोखे आंदोलन केले.

रत्नागिरी : ‘दार उघड, उद्धवा दार उघड’असा गजर आणि घंटानाद करत भाजपने दक्षिण रत्नागिरीतील मंदिरांबाहेर अनोखे आंदोलन केले. कोरोनाच्या संकटकाळामध्ये मानसिक आधार देण्यासाठी आराध्य देवतेचे दर्शन मिळावे व त्यातून मानसिकता सुदृढ होऊन कोरोनाचा सामना करता यावा, या हेतूने आज सकाळी हे आंदोलन केले. ग्रामदैवत श्री भैरी देवस्थान, श्री क्षेत्र गणपतीपुळे, पावस यांसह विविध मंदिरांच्या बाहेर हजारो भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला. 

हेही वाचा - सावंतवाडी घंटानाद आंदोलन : दार उघड उद्धवा दार उघड…! दार उघड विठ्ठला दार उघड…!

घंटानादामुळे काही काळ वातावरण प्रसन्न झाले.
 शहरातील मारुती मंदिर, श्री जुगाई मंदिर, टिळक आळी गणपती मंदिर, विठ्ठल मंदिर, जैन मंदिर यासह अनेक मंदिरांबाहेर घंटानाद केला. गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिराबाहेर दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यासह गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे, प्रमोद केळकर, अभिजित घनवटकर, सचिन दुर्गवळी आदींनी घंटानादामध्ये भाग घेतला. 

अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले, कोरोना महामारीच्या काळात भाविकांना मानसिक अधिष्ठान देणारे मंदिर आणि सर्व धार्मिक स्थळे खुली व्हावीत, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद केला. सर्व जग आता पुन्हा खुले होत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ मंदिरेसुद्धा दर्शनासाठी खुली करावीत. आवश्यक ती काळजी घेऊन भक्तगण पूर्ण जबाबदारीने दर्शन घेतील व मानसिक आधार मिळवतील.

हेही वाचा - तासाभरातच बिबट्याने घेतला सुटकेचा श्वास ; कुठे घडली घटना ?

मारुती मंदिर येथे भाजप जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष विकास सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य मुकुंद जोशी, नगरसेवक व तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, महेश सुर्वे, माजी उपनगराध्यक्ष भैय्या मलुष्टे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, अ‍ॅड. ऋषिकेश शितूत, विजय साखळकर, मोहन पटवर्धन, नितीन गांगण, अशोक वाडेकर, सौ. प्राजक्ता रूमडे, प्रविण रूमडे, शैलैश बेर्डे, हिंदु जनजागृती समितीचे संजय जोशी आदींनी घंटानाद केला.
 पतितपावन मंदिराबाहेर अ‍ॅड. बाबा परुळेकर, अ‍ॅड. कदम, भाजप शहराध्यक्ष सचिन करमरकर, बाबू सुर्वे, नगरसेविका मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर, संकेत बापट, नगरसेवक राजू तोडणकर यांनी घंटानाद केला.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the BJP incumbent rings bell in front of eight temple in ratnagiri