esakal | शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची भाजप किसान मोर्चाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Kisan Morcha Demands Immediate Compensation To Farmers

यंदा अनुकूल हवामानामुळे शेतकऱ्यांच्या हाती चांगले भात पीकाचे उत्पन्न येण्याची शक्‍यता होती. त्यामुळे बळीराजा आनंदीत होता; मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण टाकले आहे.

शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची भाजप किसान मोर्चाची मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - परतीच्या पावसाने तालुक्‍यातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन सरकारकडे अहवाल सादर करुन शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खाती जमा करावी, अशी मागणी येथील भाजप किसान मोर्चाच्यावतीने तहसिलदारांकडे केली आहे. 

यंदा अनुकूल हवामानामुळे शेतकऱ्यांच्या हाती चांगले भात पीकाचे उत्पन्न येण्याची शक्‍यता होती. त्यामुळे बळीराजा आनंदीत होता; मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण टाकले आहे. कापून ठेवलेली भात पीके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पाण्याखाली गेल्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परतीच्या मुसळधार पावसाने भातशेतीचे 70 टक्के नुकसान झाले आहे. तालुक्‍यातील कित्येक गावातील शेतीची पहाणी केली असता अनेक ठिकाणी भातपीक आडवे होऊन कोंब आलेले आहेत. विशेषतः महान बियाणे जमिनीतून पूर्ण कुजुन पुन्हा कोंब आलेले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी भुईमूग पिकाला कोंब तसेच नाचणी पीकही पूर्णतः आडवे झाले आहे.

याबाबत कृषी विभागाकडून नुकसानीचा अहवाल घेऊन शासनाकडे पाठवावा. तसेच प्रतीगुंठा 100 रुपये तुटपुंजी नुकसान भरपाई किमान प्रतिगुंठा 500 रूपये करण्यात यावी. 
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा लाभापासुन अनेक लाभार्थी वंचित आहेत. तो लाभही तात्काळ देण्यात यावा. गेल्यावर्षी नुकसान भरपाईसाठी लागणाऱ्या सातबाऱ्यास शासनाकडून पैसे घेतले जात नव्हते; परंतु आता सातबारासाठी शासन पैसे घेत आहे ते शासनाने बंद करावे. या गोष्टींचा शासनाने सहानभुतीपुर्वक विचार करावा व केवळ घोषणा न करता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना थेट मदत करावी अन्यथा शासनाविरोधात शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. 

जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष यशवंत ऊर्फ बापु पंडित, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक, बाळा सावंत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, नगरसेवक धर्मराज कांबळी, अनुसुचित मोर्चा तालुकाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय ठाकुर, शक्ती केंद्र प्रमुख नाथा मडवळ व ज्ञानेश्‍वर केळजी व तात्या कोंडसकर, किसान मोर्चा उपाध्यक्ष मकरंद प्रभू, किसान मोर्चा सरचिटणीस सत्यवान पालव, किसान मोर्चा चिटणीस अपर्णा बोवलेकर, रामचंद्र गावडे, प्रकाश बांदवलकर, विनय गोरे, शांताराम तेली, दशरथ गडेकर, संदीप खोत, भुषण बांबार्डेकर आदी किसान मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

loading image