सावंतवाडी तालुक्यात भाजप-शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला 

भूषण आरोसकर
Saturday, 16 January 2021

ग्रामपंचायत निवडणूक संभाव्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रंगीत तालीम असल्याचे बोलले जात आहे. 
तालुक्‍यातील अकरा मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. या निवडणुकीत पंचायत समिती सभापती, माजी सभापती, शिवसेना तालुकाप्रमुख आणि भाजप जिल्हा चिटणीस आदींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

ग्रामपंचायत निवडणूक संभाव्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रंगीत तालीम असल्याचे बोलले जात आहे. 
तालुक्‍यातील अकरा मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. 11 ग्रामपंचायतीत 111 सदस्यांसाठी ही निवडणूक झाली. पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांची इन्सुली, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांची माळगाव, माजी सभापती पंकज पेडणेकर यांची तळवडे व भाजपाचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांची कोलगाव ग्रामपंचायत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

यांच्यासाठी या ग्रामपंचायतीचे मोठे महत्त्व असून या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणे ठरणार आहेत. 
कोलगाव, इन्सुली या ग्रामपंचायतीत शिवसेनेची तर मळगाव, तळवडा ग्रामपंचायतीत भाजपाची सध्या सत्ता होती. या गावातील निवडणुका होत असताना परिवर्तन व्हावे, म्हणून जोरदार प्रयत्न करण्यात आले आहेत. शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये लढत होत असून शिवसेनेसोबत काही ठिकाणी कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत सामील झाली आहेत; मात्र मुख्यत्वेकरून ही निवडणूक शिवसेना आणि भाजपा मध्येच लढत आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने काही ग्रामपंचायत उमेदवार रिंगणात उतरले असून काही ग्रामपंचायतीत ते शिवसेनेसोबत महाविकास आघाडीत उतरले आहेत. 

दिग्गज प्रचारात 
या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा चिटणीस महेश सारंग अशांना प्रचारात उतरले तर शिवसेना महाविकास आघाडीचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी व जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष बाळा गावडे या निवडणुकीत प्रचारात उतरले आहेत. 

येथे जोरदार लढत 
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावविकासावर मतदान होणार असून गावात कायम सक्रियपणे लोकांची कामे करत असणाऱ्या सदस्यांना ही निवडणूक जड जाणार नाही, अशी चर्चा आहे. कोलगाव, मळगाव, तळवडा, इन्सूली, आंबोली, आरोंदा, चौकुळ, आरोस, दांडेली आदी ठिकाणी जोरदार लढत होणार आहे. सरळ लढतीत काही अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने आणखीणच रंगत वाढली आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP-Shiv Sena reputation Sawantwadi taluka grampanchayat election