रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी भाजपचा स्वतंत्र उमेदवार? 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

शिवसेनेचे राहुल पंडित यांना पाच वर्षांसाठी निवडून दिले होते. मात्र पक्षांतर्गत वाटाघाटीमुळे अडीच वर्षानंतर त्यांनी राजीनामा दिला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

रत्नागिरी - नगराध्यक्ष पोटनिवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. शहर विकास आघाडी विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार होती. मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकीय समीकरणे बदलली आहेत. स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्यामुळे भाजप आपली ताकद वाढविण्यासाठी स्वतंत्र उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाले तर मतांचे विभाजन होऊन निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्‍यता आहे. 

सेनेकडून बंड्या साळवी तर आघाडीकडून कीर रिंगणात

शिवसेनेकडून प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांचे नाव निश्‍चित आहे. आघाडीकडून मिलिंद कीर रिंगणात आहेत. येत्या आठ दिवसांत निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेचे राहुल पंडित यांना पाच वर्षांसाठी निवडून दिले होते. मात्र पक्षांतर्गत वाटाघाटीमुळे अडीच वर्षानंतर त्यांनी राजीनामा दिला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

या पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून त्यांचेच नाव निश्‍चित झाले आहे. शहरवासीयांवर लादलेली ही निवडणूक असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, आरपीआय, मनसे या सर्व पक्षांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी स्थापन केली. मिलिंद कीर यांची उमेदवारी घोषित झाली. मात्र ही पोटनिवडणूक मागे पडली. या दरम्यान खासदार नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाला.

स्वाभिमानचे नीलेश राणे यांनी शहरातील काही प्रश्‍न हाताळून हवा केली. त्यांना युतीच्या पंगतीत बसणे भाग पडण्याची शक्‍यता आहे. राज्यातील घडामोडीवर या पोटनिवडणुकीसाठी युती अवलंबून आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी केली आहे. प्रभागनिहाय मतदार याद्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केल्या आहेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यत पोचण्याचा फॉर्म्युला सुरू झाला आहे. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे. 

रत्नागिरी शहरातील एकूण मतदार ५२ ते ५५ हजार 

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमान आदींची स्वतंत्र मते आहेत. आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने 17 हजाराच्या वर, त्यात भाजप साडे सहा ते सात हजार, काँग्रेस आघाडीला साडे नऊ ते दहा हजार अशी मते मिळाली आहेत. शहरातील एकूण मतदार 52 ते 55 हजार आहेत. त्यापैकी 30 ते 35 टक्के मतदान होते. त्या अनुषंगाने 17 ते 18 हजारावर मते मिळणारा उमेदवार निवडून येणार हे निश्‍चित झाले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Will Give Candidate For Ratnagiri City President Election