भाजप प्रणित पॅनेल 19 ग्रा. पं. वर विजयी होईल, माजी आमदार बाळ माने यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

राई, नाचणे, वरवडे, चांदेराई, काळबादेवी, पावस, गडनरळ, नांदिवडे, कासारी, सडामिऱ्या, जाकिमिऱ्या, कळझोंडी, गावखडी, डोर्ले, बसणी, कोतवडे, डिंगणी, रिळ आणि झरेवाडी या 19 ग्रामपंचायतीत भाजप प्रणित पॅनेल विजयी होईल.

रत्नागिरी - येथील विधानसभा मतदारसंघात काल झालेल्या मतदानाचा आढावा घेतल्यानंतर भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी 19 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. 18 ग्रामपंचायती या फक्त गावपॅनेलच्या माध्यमातून निवडून येतील. पण या ग्रामपंचायती व सदस्य आमचेच आहेत, असे सामंत सेनेने नंतर जाहीर करून मतदारांना बनवू नये, अशी टीकाही माने यांनी केली. 

गावपॅनेल आणि भाजपच्या निवडून येणाऱ्या 60 पैकी 37 ग्रामपंचायती या विद्यमान मंत्री उदय सामंत यांच्या विरोधातील जनमत असल्याचे सांगून माने म्हणाले, भाजपचा पारंपरिक मतदार ग्रामीण भागांत भरपूर आहे. त्यामुळे भाजपप्रणित पॅनेलच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अनेक ग्रामपंचायती आहेत. 

राई, नाचणे, वरवडे, चांदेराई, काळबादेवी, पावस, गडनरळ, नांदिवडे, कासारी, सडामिऱ्या, जाकिमिऱ्या, कळझोंडी, गावखडी, डोर्ले, बसणी, कोतवडे, डिंगणी, रिळ आणि झरेवाडी या 19 ग्रामपंचायतीत भाजप प्रणित पॅनेल विजयी होईल. शिवारआंबेरे, कर्ला, गोळप, गुंबद, सैतवडे, नाणीज, नाखरे, सोमेश्‍वर, नेवरे, गणपतीपुळे, चाफे, ओरी, मांजरे, कुरधुंडा, परचुरी, कापडगाव, हातखंबा, खालगाव, उक्षी येथे बिगर राजकीय गाव पॅनेलचा विजय होईल. यामुळे या ग्रामपंचायतींवर सामंत सेनेने हक्क सांगू नये. अन्यथा त्यांनाही ग्रामपंचायत आमचीच आहे, असे सांगायची त्यांची सवय आहे, अशी खिल्ली उडवली. या मतदारांचा अपमान करू नका, असा टोमणा माने यांनी सामंत यांना हाणला. 

या निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी खासदार नीलेश राणे, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांच्यासमवेत मी झंझावाती दौरे केले. तसेच तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, सरचिटणीस उमेश कुळकर्णी, सतीश शेवडे, पं. स. सदस्य सुशांत पाटकर, प्रमोद अधटराव, राकेश जाधव, दीपिका जोशी, ऍड. भाऊ शेट्ये, अशोक मयेकर, अनिकेत पटवर्धन, हरीभाई पटेल, विकास सावंत, अशोक वाडेकर, नित्यानंद दळवी, सचिन करमरकर, पल्लवी पाटील, संपदा तळेकर आदींनी सहकार्य केल्याचे माने यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी आणलेल्या योजनांचा लाभ 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी विविध योजना आणल्या. पंतप्रधान मोदी यांनी ग्रामविकासाच्या आणलेल्या विविध योजनांचा लाभ असंख्य ग्रामस्थांना मिळाल्याने भाजपला मतदान झाल्याचा दावा बाळ माने यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will win 19 Garmpanchayat Ex MLA Balasaheb Mane Claim