काँग्रेसचा व्हीप सदस्यांनी डावलल्याने भाजपने मारली 'येथे' बाजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

येथील पंचायत समितीची सभापती उपसभापती निवड आज पंचायत समिती सभागृहात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - काँग्रेसकडून फडकाविण्यात आलेला पक्षाचा व्हिप डावलून येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारत आपला झेंडा फडकविला. सभापती मानसी धुरी तर उपसभापती शितल राऊळ यांनी महाविकास आघाडीच्या मनिषा गोवेकर व मेघश्याम काजरेकर यांचा 13 विरुध्द 5 अशा फरकाने पराभव केला.

येथील पंचायत समितीची सभापती उपसभापती निवड आज पंचायत समिती सभागृहात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मूळ काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या व राणे समर्थक असलेल्या दहा सदस्यांना काँग्रेसकडून व्हिप बजावण्यात आला होता. मुळ काँग्रेसच्या असलेल्या मनिषा गोवेकर तर शिवसेनेचे मेघश्याम काजरेकर हे सभापती उपसभापतीपदासाठी रिंगणात होते.

काँग्रेसचे मतदान भाजपला

पंचायत समितीत मुळ काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्यांची सदस्यसंख्या ही एकूण अकरा आहे. त्यापैकी मनिषा गोवेकर सोडता दहा सदस्यांना काँग्रेसने बजावताना महाविकास आघाडीच्या सभापती व उपसभापती यांना मतदान करा, असे सूचित केले होते. मात्र तसे न होता राणे समर्थक असलेल्या दहाही सदस्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्याने या ठिकाणी पुन्हा एकदा राणेसमर्थक भाजपमधील सत्ता आली.

काँग्रेसच्या खेळीनंतर निवडीकडे लक्ष

गत उपसभापती निवड दरम्यानही काँग्रेसने व्हीप बजावली होती मात्र त्यावेळीही राणे समर्थकांनी सत्ता घेतली होती आजही ते चित्र याठिकाणी पाहायला मिळाले. गतवेळी भाजपचे सदस्य शिवसेनेसोबत होते, मात्र यावेळी खुद्द राणेच भाजपमध्ये गेल्याने यावेळी ही निवड भाजपच्या बाजूने होणार हे निश्चित होते. मात्र काँग्रेसकडून खेळण्यात आलेल्या खेळीनंतर सर्वांचे लक्ष या निवडीकडे लागले होते.

अभिनंदनाचा वर्षाव

मानसी धुरी व शीतल राऊळ यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्याने पंचायत समिती परिसरात जोरदार घोषणाबाजी करत एकच जल्लोष केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने पंचायत समिती परिसरात उपस्थित होते. सभापतीपदी मानसी धुरी तर उपसभापतीपदी शीतल राऊळ यांची वर्णी लागल्यानंतर भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली, तालुकाध्यक्ष महेश सारंग, जिल्हा बॅंक संचालक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजू परब आदीनी भेट घेऊन पुष्यगुच्छ देत अभिनंदन केले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप पक्षाचा विजय असो नारायण राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है...अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Wins in Sawantwadi Panchayat Samitti Sindhudurg Marathi News