दांडेलीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आव्हान 

bjp's challenge shivsena's dandeli konkan sindhudurg
bjp's challenge shivsena's dandeli konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - ग्रामपंचायत निवडणुकांची धुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीतर्फे शिवसेना व भाजपने कंबर कसली आहे. तालुक्‍यातील दांडेली ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा वरचष्मा आहे; मात्र राणे प्रवेशामुळे ताकद मिळालेल्या भाजपने शिवसेनेसमोर नवखे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने पहिल्यांदाच आव्हान निर्माण केले आहे. शिवसेनेचा ग्रामपंचायतीवरील वरचष्मा कमी करण्यात भाजप यशस्वी होते का? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

1994ला आरोसची फाळणी करून दांडेली हा गाव नवीन अस्तित्वात आला. यावेळी शिवसेनेचे एक हाती सत्ता होती. दीपक केसरकर हे राष्ट्रवादीत असल्यामुळे याठिकाणी बरेच वर्षे केसरकर समर्थकांचा बोलबाला होता. त्यानंतर केसरकर समर्थकांनी सुरुवातीला राष्ट्रवादी व त्यानंतर शिवसेना पक्ष या गावात मजबूत केला. कोणत्याही लोकप्रतिनिधीचा या ग्रामपंचायतीवर वर्चस्व नसले तरी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याठिकाणी शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम केले.

केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर गावचे तत्कालीन उपसरपंच योगेश नाईक यांनी युवा सेनेचे तालुका अधिकारी हे पद मिळवून विकासकामांना न्याय दिला. बरीच वर्षे शिवसेनाचा दबदबा ग्रामपंचायतवर राहिला असला तरी होणाऱ्या निवडणुकीत भाजपनेही तिन्ही प्रभागात उमेदवार दिल्यामुळे थोडीशी रंगत या निवडणुकीत येणार आहे. 

प्रभाग क्रमांक धनगरवाडी, खोतवाडी, बनवाडी, नेमलेवाडी, कामतवाडी, घोणसेवाडी, फणसमाडे हा जास्त मतदार असलेला प्रभाग असून यात तब्बल सात उमेदवार रिंगणात आहेत. श्री. नाईक शिवसेनेतर्फे लढणार असून युवा सेनेतही उपसरपंच पदही भूषविले आहे. त्यांच्यासमोर भाजप पुरस्कृत दिनेश माणगावकर यांचे आव्हान आहे. यात तानाजी खोत हे अनुभवी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत राहिले आहेत. त्यांच्यासमोर श्रीकृष्ण पुनाळेकर हे अपक्ष म्हणून उभे असून पुनाळेकर यांचे तगडे आव्हान त्यांना असेल.

पुनाळेकर हे सुद्धा माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जवळही चांगला अनुभव आहे. या दोघांसमोर भाजप पुरस्कृत निलेश आरोलकर हा नवा चेहरा रिंगणात उतरला आहे तर सर्वसाधारण महिला उमेदवारांमधून शिवसेनेतर्फे सामाजिक कार्यकर्ते उदय मालवणकर यांच्या पत्नी वर्षा मालवणकर याही रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजप पुरस्कृत प्रतीक्षा खरात या रिंगणात आहेत. हे दोन्ही नवे चेहरे नशीब आजमावणार आहेत.

वार्ड क्रमांक दांडेलीवाडी आणि आरोसकरवाडीत शिवसेनेकडून विनाली नाईक व भाजप पुरस्कृत रिता शेट्ये हे दोन्ही नवे चेहरे रिंगणात आहेत तर सर्वसाधारण पुरुष उमेदवारमधून शिवसेनेकडून अनुभवी व माजी सरपंच नारायण ऊर्फ बाळा मुरकर हे तगडे उमेदवार असून त्यांच्यासमोर भाजप पुरस्कृत कृष्णा पालेकर यांचे आव्हान राहणार आहे. वार्ड क्रमांक 3 बाजारवाडी वरचावाडा असून याठिकाणी पहिल्यांदा शिवसेनेसमोर अनुभवी उमेदवार आहे. शिवसेनेच्या दीप्ती दाभोलकर या भाजप पुरस्कृत प्रफुल्लता मालवणकर त्यांना टक्कर देणार आहेत तर खुल्या प्रवर्गातून शिवसेनेकडून उमा पांगम या रिंगणात असून माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय संजय पांगम यांच्या पत्नी आहेत. त्यांच्यासमोर रचना माणगावकर हा नवा चेहरा भाजप पुरस्कृत म्हणून निवडणूक रिंगणात आला आहे.

भाजपकडून नवखे चेहरे रिंगणात असले तरी एखादा उमेदवार निवडून आला तरी हा त्यांच्यासाठी मोठा विजय असणार आहे. संदीप माणगावकर, सिद्धेश मालवणकर व इतर कार्यकर्ते ताकद पणाला लावत आहेत. युवासेनेचे योगेश नाईकसह शिवसेनेकडून संजय पांगम, बाळा मोरजकर, विठ्ठल नाईक, चंद्रकांत गोडकर, बंटी खोत यांनी शिवसेनेकडून विकास कामांसाठी प्रयत्न केला आहे. 

भाजपची ताकद पणाला 
दांडेली हा मळेवाड जिल्हा परिषद हवेली पंचायत समिती अंतर्गत येत असल्याने जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा कायम आहे. त्यामुळे भाजपला आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे. शिवसेनेकडून अनुभवी उमेदवार रिंगणात असून त्यांच्यापुढे भाजपचे उमेदवार टिकणार का? हे चित्र मतदानानंतर स्पष्ट होणार आहे. 
----------- 
प्रभागांवर एक नजर 
प्रभाग क्रमांक 1 ः धनगरवाडी, खोतवाडी, बनवाडी, नेमलेवाडी, कामतवाडी, घोणसेवाडी, फणसमाडे. 
मतदार ः जवळपास 340 
सदस्य संख्या ः 3 
--------- 
प्रभाग क्रमांक 2 ः दांडेलीवाडी, आरोसकरवाडी 
मतदार ः जवळपास 200 
सदस्य संख्या ः 2 
----------- 
प्रभाग क्रमांक 3 ः बाजारवाडी, वरचावाडा 
मतदार ः जवळपास 250 
सदस्य संख्या ः 2 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com