समुद्र खवळला; जयगडात नौका आश्रयाला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 September 2019

रत्नागिरी - गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू झालेल्या पावसाचा जोर गेले तीन दिवस कायम आहे. ऋषी पंचमीच्या दिवशी वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे गणेशभक्‍तांना घरातून बाहेर पडणे शक्‍य होत नव्हते. खवळलेल्या समुद्रामुळे मुंबई, रायगडसह परजिल्ह्यातील शेकडो नौकांनी सुरक्षेसाठी जयगड किनारा गाठला होता.

रत्नागिरी - गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू झालेल्या पावसाचा जोर गेले तीन दिवस कायम आहे. ऋषी पंचमीच्या दिवशी वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे गणेशभक्‍तांना घरातून बाहेर पडणे शक्‍य होत नव्हते. खवळलेल्या समुद्रामुळे मुंबई, रायगडसह परजिल्ह्यातील शेकडो नौकांनी सुरक्षेसाठी जयगड किनारा गाठला होता. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गणेशभक्तांच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरले. 

मंगळवारी (ता. 3) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी पाऊस 73 टक्‍के पडला आहे. मंडणगड 66, दापोली 98, खेड 42, गुहागर 30, चिपळूण 52, संगमेश्‍वर 51, रत्नागिरी 137, लांजा 115, राजापूर 73 मिलिमीटरची नोंद झाली आहे. आतापर्यंत 3830 मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला आहे. ऑगस्टअखेरपर्यंत एकूण सरासरीच्या 108 टक्के पाऊस झाला. वेगवान वाऱ्यामुळे समुद्रही खवळलेला असून मच्छीमारी शंभर टक्‍के ठप्प झाली आहे.

एक सप्टेंबरला मासेमारीसाठी बाहेर पडलेल्या मुंबई, रायगडसह परराज्यातील नौकांनी सुरक्षित बंदरांच्या ठिकाणी आसरा घेतला आहे. जयगड येथे सव्वाशे नौका दाखल झालेल्या आहेत. मिरकरवाडा येथेही काही परजिल्ह्यातील नौका आल्या आहेत. पावसाचा जोर कमी होईपर्यंत त्यांना बंदरातच उभ्या ठेवाव्या लागणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. 

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला जोरदार पाऊस पडत होता. हा जोर सलग तीन दिवस सुरूच आहे. गणेश आगमनावेळी गणेशभक्‍तांची तारांबळ उडाली होती. ऋषी पंचमीला पावसाचा जोर कमी होईल, असे वाटत होते; मात्र दिवसभर पाऊस कोसळत होता. अनेकांना बाजारातही बाहेर पडणे शक्‍य होत नव्हते. त्यामुळे चाकरमान्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. 

चार हजारचा टप्पा ओलांडणार 
तीन महिन्यांत सर्वाधिक पाऊस मंडणगडमध्ये पडला असून, सर्वांत कमी रत्नागिरी तालुक्‍यात झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे. पावसाचा जोर लक्षात घेता सप्टेंबरमध्ये पाऊस चार हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडेल, अशी शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boat shelter in Jaigad Due to high current Sea waves