सावंतवाडीतील मोती तलावात बोटींग प्रकल्प सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

सावंतवाडी - येथील मोती तलावात सुरू करण्यात आलेले स्कुबा डायव्हिंग आणि बोटींग प्रकल्प शहराच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने महत्वाचा ठरेल, असा विश्‍वास नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे व्यक्त केला.

सावंतवाडी - येथील मोती तलावात सुरू करण्यात आलेले स्कुबा डायव्हिंग आणि बोटींग प्रकल्प शहराच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने महत्वाचा ठरेल, असा विश्‍वास नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे व्यक्त केला.

येथील पालिका व शिरोडा येथील राज स्कुबा डायव्हिंग यांच्यावतीने येथील मोती तलावात प्रायोगिक तत्वावर बोटींग प्रकल्प सुरू करण्यात आला. याचे उद्‌घाटन नगराध्यक्ष साळगावकर यांच्या हस्ते आज झाले.

उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, भारती मोरे, दिपाली भालेकर, उदय नाईक आदी उपस्थित होते.

श्री. साळगावकर पुढे म्हणाले, ""सावंतवाडीला निसर्गाने भरभरुन दिले आहे. याचकारणाने अलिकडच्या काळात याठिकाणी पर्यटकांची संख्याही वाढत आहे; मात्र निसर्ग पर्यटनासोबत येणाऱ्या पर्यटकांना वेगळे काय तरी देण्याच्या हेतूने शहराची शान असलेल्या मोती तलावात शिरोडा येथील राज स्कुबा ड्रायव्हिंग या व्यावसायिकाच्या वतीने बोटींग प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये विशेष करुन स्कुबा डायव्हिंगची सोय देण्यात आली आहे. समुद्रात करण्यात येणारे स्कुबा डायव्हिंग तलावात सुद्धा होणार आहे. त्यामुळे येथील पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा.''

प्रकल्पाबाबत माहिती देतांना श्री. नाईक म्हणाले, ""पर्यटकांना व येथील लोकांना चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी आमचे नेहमी प्रयत्न असणार आहेत. यात बंपर, स्पीड बोट, बनाना, स्कुबा डायव्हिंग असे पाण्यावरील पाण्याच्या आतील विविध साहसी खेळ उपलब्ध आहेत. लोकांचे सहकार्य लाभल्यास आणखीन चांगले खेळ याठिकाणी उपलब्ध केले जाणार आहेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boating project starts in Moti Talav in Sawantwadi