खराब हवामानाचा फटका; परराज्यातील नौकांनी शोधले सुरक्षित बंदर, यंत्रणा अलर्ट

संतोष कुळकर्णी
Monday, 14 September 2020

दरम्यान, बदलत्या वातावरणामुळे स्थानिक मच्छीमारी कोलमडली आहे. 
गेल्या दोन दिवसांपासून किनारपट्टीवरील वातावरण खराब झाले आहे. वादळी वाऱ्यासह अधूनमधून जोराच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत.

देवगड (सिंधुदुर्ग) - समुद्रातील खराब हवामान, वादळसदृश स्थिती यामुळे सर्वार्थाने सुरक्षित समजल्या जाणाऱ्या येथील देवगड बंदरात गुजरातमधील 34 आणि दीव-दमणमधील दोन, अशा एकूण 36 बाहेरील मच्छीमारी नौका आश्रयाला आल्या आहेत. उद्यापर्यंत (ता.14) समुद्र खवळलेला राहण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरील मच्छीमारी नौका सुरक्षिततेसाठी येथे आल्याचे सांगण्यात आले. बंदरात बाहेरील नौका दाखल झाल्याने स्थानिक सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.

दरम्यान, बदलत्या वातावरणामुळे स्थानिक मच्छीमारी कोलमडली आहे. 
गेल्या दोन दिवसांपासून किनारपट्टीवरील वातावरण खराब झाले आहे. वादळी वाऱ्यासह अधूनमधून जोराच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. खोल समुद्रात वादळसदृश स्थिती आणि हवामान खराब झाल्याने स्थानिक मच्छीमारी नौकांसह बाहेरील राज्यातील मच्छीमारी नौका आश्रयासाठी येथील बंदरात दाखल झाल्या आहेत. यामध्ये गुजरातमधील 34 आणि दीव-दमणमधील दोन, अशा एकूण 36 मच्छीमारी नौकांचा समावेश आहे.

बंदरात आलेल्या एकूण 36 नौकांवर मिळून एकूण 299 मच्छीमार आहेत. बाहेरील आलेल्या मच्छीमारी नौकांबाबत सागरी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे यांनी माहिती घेत नौकांची तपासणी केली. त्यांच्यासोबत पोलिस उपनिरीक्षक संपत जगताप, सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळू चंदनशिवे, महिला पोलिस हवालदार वनिता पडवळ, पोलिस शिपाई विनायक चव्हाण आदी होते. बंदरात बाहेरील नौका आल्याने सुरक्षितता बाळगली जात आहे. उद्यापर्यंत (ता. 14) समुद्रातील वातावरण खराब राहणार असल्याने मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्याचे टाळावे, असे आवाहन केले जात आहे. 

मासळीची उलाढाल मंदावली 
खराब हवामानामुळे स्थानिक मच्छीमारी धीम्या गतीने सुरू आहे. वाऱ्यामुळे छोट्या नौकाधारकांनी समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळले. त्यामुळे येथील खाडीकिनारी मासळी उलाढाल मंदावल्याचे चित्र होते. मासळी कमी झाल्याने उपलब्ध मासळीचे दर वधारले होते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boats from other states arrive at Devgad port