पोलिसांची धावपळ, तरीही `तिचे` गुढ कायमच

भूषण आरोसकर
Wednesday, 9 September 2020

संबंधित महिलेचा मृतदेह आंबोली रेस्क्‍यू टीम व आंबोली पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. मृतदेह कुजला असल्याने ओळख पटविणे खूप कठीण बनले आहे.

सावंतवाडी (सिंधुुदुर्ग) - आंबोली घाटात काल (ता.7) सापडलेला महिलेचा मृतदेह स्थानिक नसुन बेळगाव, कोल्हापूर व इतर भागातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. आज कागल येथील एक महिला बेपत्ता असल्याच्या कारणावरून संबंधित नातेवाईक पहाणीसाठी आले होते; मात्र ती नसल्याचे स्पष्ट झाले. आज कोल्हापूर, बेळगाव रत्नागिरी तसेच इतर काही ठिकाणच्या पोलिस ठाण्यामध्ये घटनेबाबत माहिती दिली आहे; मात्र घटनेबाबतचे गूढ वाढले आहे. 

आंबोली घाटात सेल्फी काढण्यासाठी थांबलेल्या युवकांना उग्र वास आल्यामुळे केलेल्या पहाणीतून त्यांना मृतदेह आढळला. याबाबतची माहिती त्यांनी तातडीने आंबोली पोलिस ठाण्याला दिली. संबंधित महिलेचा मृतदेह आंबोली रेस्क्‍यू टीम व आंबोली पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. मृतदेह कुजला असल्याने ओळख पटविणे खूप कठीण बनले आहे. काल (ता.7) मळगाव येथील बेपता महिलेच्या नातेवाईकांनी पहाणी केली असता ती नसल्याचे त्यांनी सांगितले.

काल तातडीने येथील पोलिसांनी गोवा, कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्गातील सर्व पोलिस ठाण्यात याबाबत माहिती कळवली. काल सायंकाळी उशिरा कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील एका बेपता असलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी संबंधित मृतदेहाची पहाणी केली; मात्र संबंधित महिला नसल्याचे स्पष्ट झाले. या घटनेचे गूढ आणखीनच वाढले. संबंधित महिलेचे विच्छेदन केले आहे, तसेच व्हिसेराही राखून ठेवला आहे, अशी माहिती महिला पोलिस अधिकारी स्वाती यादव यांनी दिली. घटनास्थळी अन्य कोणताही पुरावा नसल्याने मृतदेहाच्या पायात असलेल्या पैंजणच्या ठेवणीवरून सध्या तरी ही महिला घाटमाथ्यावरची असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमित गोते यांच्याकडे सोपविल्याचे श्री. गोते यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: body case in amboli konkan sindhudurg