
शहरातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर या उड्डाणपुलाला जोडणाऱ्या बॉक्सवेल भिंतीचा भाग यंदाच्या पावसाळ्यात कोसळला होता.
कणकवली (सिंधुदुर्ग) - महामार्ग चौपदरीकरणात धोकादायक झालेली शहरातील बॉक्सवेलची भिंत हटविण्याचे सुरू करण्यात आले आहे; मात्र हटविलेल्या बांधकामाच्या ठिकाणी पुन्हा बॉक्सवेल भिंत होणार, की उड्डाणपुलाचे विस्तारीकरण होणार? याबाबत अनिश्चितता आहे. उड्डाणपुल विस्तारीकरणासाठी 40 कोटींची आवश्यकता असून, त्या खर्चाला अद्याप केंद्र शासनाने मंजुरी दिलेली नाही.
शहरातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर या उड्डाणपुलाला जोडणाऱ्या बॉक्सवेल भिंतीचा भाग यंदाच्या पावसाळ्यात कोसळला होता. त्यानंतर बॉक्सवेलची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. तर सध्या हा धोकादायक भाग हायवे ठेकेदाराकडून पूर्णतः काढून टाकला जात आहे.
दरम्यान, धोकादायक ठरलेली बॉक्सवेल भिंत काढून तेथे नव्याने प्लेट बांधून भिंत उभारली जाणार होती; परंतु भिंती ऐवजी उड्डाणपुलाची मागणी विविध राजकीय पक्ष आणि शहरवासीयांकडून झाली होती. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात हे काम सुरू होणार होते. त्याअनुषंगाने शहरातील वाहतूक मसुरकर किनई आणि टेंबवाडी रस्ता मार्गे वळविण्याचीही तयारी पोलिस प्रशासनाने केली होती; मात्र आता केवळ धोकादायक भिंत हटविली जाणार आहे. तसेच तेथे नवीन भिंतीचे काम होणार नसल्याने पोलिस बंदोबस्त आवश्यक नसल्याचे महामार्ग विभागाने कळविले आहे.
संपादन - राहुल पाटील