esakal | Kokan: मासेमारीला ब्रेक, दरात मोठी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan: मासेमारीला ब्रेक, दरात मोठी वाढ

Kokan: मासेमारीला ब्रेक, दरात मोठी वाढ

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा

मालवण : वादळसदृश परिस्थितीमुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील मासेमारीला ब्रेक लागला आहे. समुद्रातंर्गत वातावरणात मोठे बदल झाल्याने मच्छीमारांनी मासेमारीस जाण्याचे टाळले आहे. परिणामी उपलब्ध मासळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मासेमारी हंगामात सातत्याने वादळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने मच्छीमारांसमोरील चिंता वाढली आहे. मासळीच्या दरात वाढ झाल्याने मत्स्य खवय्यांच्या खिशाला चांगलीच चाट बसत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: IPL 2021: CSKचा 'प्ले-ऑफ्स'मध्ये दणक्यात प्रवेश! हैदराबाद OUT

कोरोनाची लाट ओसरत असताना तोक्ते वादळानंतर हळूहळू व्यावसायिक सावरत असताना पुन्हा समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील मासेमारीला ब्रेक लागला आहे. मासेमारी हंगामाच्या सुरवातीस समुद्रातील वातावरणात बदल होत असल्याने त्याचा मासेमारीस मोठा फटका बसल्याचे दिसून आले. बारदानी वार्‍यांचा जोर वाढल्याने मच्छीमारांच्या पदरी निराशा पडली. गणेशोत्सवानंतर रापणकर मच्छीमारांना बांगडा, धोडीया, सुरमई, कोळंबी यासारख्या मासळीची चांगली कॅच मिळाली; मात्र चांगली कॅच मिळूनही मासळीला चांगला दर न मिळाल्याने रापणकर मच्छीमारांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

गेल्या चार पाच दिवसात समुद्रातंर्गत वातावरणात पुन्हा बदल होण्यास सुरवात झाली. मधल्या काळात चांगली मासळी मिळत असल्याने रापणकर मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण होते; मात्र समुद्रात अचानक बदल झाल्याने रापणकर मच्छीमारांच्या रापणीच्या जाळ्यात मासळीच मिळणे दुरापास्त बनले. त्यामुळे शहरातील चिवला, दांडीसह परिसरातील मच्छीमारांनी रापण लावणे बंद केले. आता हवामान खात्याने किनारपट्टीस वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तविल्याने रापणकर मच्छीमारांनी खबरदारी म्हणून आपल्या होड्या किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. तियानी, न्हय पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना गेल्या पंधरवड्यात चांगली मासळी मिळत होती. या मासळीला चांगला दरही मिळत होता; मात्र सातत्याने समुद्रातंर्गत वातावरणात बदल होत असल्याने त्यांच्यात निराशा पसरली आहे.

हेही वाचा: Video: धोनी स्टाईलमध्ये विषय END! पाहा MS चा विजयी सिक्सर...

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार वादळाचे परिणाम समुद्रात जाणवू लागले आहेत. वार्‍याचा जोर वाढला असून मुसळधार पाऊसही कोसळत आहे. समुद्रातंर्गत बदलामुळे तियानी, न्हय पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीस जाण्याचे टाळले आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील मासेमारी पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. बाजारपेठेत काही ठराविकच मासळी उपलब्ध होत आहे. मच्छीमार मासेमारीस समुद्रात न गेल्याने आज उपलब्ध झालेल्या बांगडा मासळीच्या टोपलीचा दर १५०० रुपये एवढा वधारला होता. मासळी मंडईत २०० रुपयांना आठ नग अशा दराने बांगड्याची विक्री होत होती. अन्य प्रकारची किंमती मासळी उपलब्ध नव्हती. यावर्षीचा मासेमारी हंगाम चांगला जाईल अशी अपेक्षा मच्छीमारांमधून व्यक्त होत होती; मात्र समुद्रात सातत्याने वादळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने मासेमारी हंगामाला त्याचा मोठा फटका बसत आहे. आणखी काही दिवस किनारपट्टी भागात वादळसदृश परिस्थिती कायम राहण्याची शक्यता स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.

मासळीच्या दरात वाढ

समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा फटका मासेमारीला बसला आहे. प्रशासनाकडून मच्छीमारांना सावधानतेच्या सूचना दिल्याने अनेक मच्छीमारांनी मासेमारीस जाण्याचे टाळले आहे. त्यामुळे किरकोळ प्रमाणात उपलब्ध होणार्‍या मासळीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बांगडा व्यतिरिक्त अन्य किंमती मासळी उपलब्ध नसल्याने बांगड्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी मत्स्यखवय्यांना या मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. मासळीच्या दरात वाढ झाल्याने हॉटेलमधील मासळीच्या ताटाचा दरही वाढला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मत्स्य खवय्यांच्या खिशाला चाट बसत आहे.

मासेमारी हंगामाची सुरवातच खडतर राहिली आहे. समुद्रात सातत्याने वादळसदृश परिस्थिती निर्माण होत असून त्याचा मासेमारीला फटका बसला आहे. गणेशोत्सव काळात रापणकर मच्छीमारांना मासळीचे चांगले उत्पन्न मिळाले खरे मात्र मागणी कमी असल्याने दर कमी मिळाला. गेले काही दिवस समुद्रात वादळसदृश परिस्थिती असल्याने रापणीच्या मासेमारीला मासळीच मिळणे कठीण बनले आहे. वादळाच्या शक्यतेने मच्छीमारांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.

- विश्वास कांबळी, रापणकर मच्छीमार

loading image
go to top