आरे - वारे किनाऱ्याचा पर्यटन विकास अडकला कशात ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

गोव्याप्रमाणेच कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. एकीकडे डोंगर दुसरीकडे अथांग, स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा अशी स्थिती आरे-वारे येथे पाहायला मिळते.

रत्नागिरी - कोकणातील किनाऱ्यांकडील पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र सीआरझेडच्या बंधनामुळे पर्यटकांना पुरक व्यवस्था करून देता येत नाही. गणपतीपुळे मार्गावरील पर्यटनासाठी हॉट पॉइंट बनलेल्या आरे - वारे किनाऱ्यावर पर्यटन सुविधा देण्यासाठी एक कोटी रुपये कोकण ग्रामीण पर्यटनमधून मंजूर आहेत. तो निधी सीआरझेडच्या परवानगीत अडकला असून पर्यटन विकासाला खीळ बसत आहे. 

गोव्याप्रमाणेच कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. एकीकडे डोंगर दुसरीकडे अथांग, स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा अशी स्थिती आरे-वारे येथे पाहायला मिळते. गणपतीपुळेकडे जाणारा पर्यटक आरे किनाऱ्यावर थांबूनच पुढे जातो. सध्या सांगली, पुणे, मुंबई येथून अनेक पर्यटकांकडून आरे किनाऱ्यावर राहण्यासाठी चाचपणी केली जाते.

हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यात पारा घसरल्याने यांना दिलासा 

खाडी किनारी भरतीवेळी बोटींग सुरू केले असून त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक थांबतात. याठिकाणी दाट सुरुचे बनही विकसित केलेले आहे. पर्यटनासाठी नैसर्गिक स्थिती पोषक असतानाही मात्र पर्यटकांना राहण्यासाठी सुविधाच नाहीत. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडून कोकण ग्रामीण पर्यटन योजनेंतर्गत एक कोटी रुपयांचा आराखडा बनवला होता. त्यात आठ खोल्या, एमपी थिएटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था यासह किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्यांसाठी अन्य सुविधा दिल्या जाणार होत्या.

हेही वाचा - मोबदल्यासाठी कुडाळ तालुक्यात मनसेने केला घंटानाद 

किनाऱ्यावर बांधकामासाठी सीआरझेडची परवानगी न मिळाल्यामुळे या सुविधांची उभारणीच करता आलेली नाही. एकीकडे खासगी हॉटेल्सची साखळी या भागात उभारली जात असताना शासकीय जागा उपलब्ध असून तिथे पर्यटकांना सुविधा देता येत नाहीत. दाट सुरुबनामधील मोकळ्या जागे बांधकाम केले जाणार होते. पण त्याला परवानगीच नसल्याने ग्रामीण पर्यटनचा एक कोटीचा निधी पडून राहीला आहे. रत्नागिरीत पर्यटक स्थिरावत नाहीत, एक दिवसात पुढे निघून जातात. एक दिवस पर्यटक राहिला तर संबंधित व्यावसायिकाला किमान दोन हजार रुपये मिळतात. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आरे-वारे सारख्या हॉट पॉईटवर सुविधांची गरज आहे. 

बांधकामास परवानगी नाही

कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेंतर्गत एक कोटी रुपये आरे - वारे किनाऱ्यावर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ठेवले आहेत. सीआरझेड नियमामुळे तेथे बांधकाम करता येत नाही. 
- मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

टेहळणी मनोरा अडकला 

आरे किनाऱ्यावर जीवरक्षक नेमण्यात आले असून टेहळण्यासाठी मनोरा उभारण्यात आला होता. त्यालाही पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळालेली नाही. बहुतांश किनारी भागात मनोरे उभारलेले आहे. आरेत अनेक पर्यटक बुडाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यादृष्टीने ही गोष्ट अत्यावश्‍य मानली जात आहे. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Break To Tourism Development Of Are Ware Beach Ratnagiri Marathi News