रत्नागिरी जिल्ह्यात पारा घसरल्याने 'यांना' दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

क्‍यार वादळानंतर कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण बदलले होते. दिवाळी सरून गेली तरीही थंडीचा पत्ता नव्हता. ऑक्‍टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा जोर होता.

रत्नागिरी - उत्तरेकडून थंड वारे येऊ लागल्यामुळे कोकणातील पारा घसरला आहे. सलग तीन दिवस रत्नागिरीत किमान तापमान 20, तर दापोलीत 13.5 अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आला आहे. गतवर्षी याच कालावधीत दापोलीमध्ये 9 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. पारा घसरल्यामुळे जिल्ह्यात थंडीचा प्रभाव जाणवत आहे. रात्रीच्यावेळी शेकोट्या पेटू लागल्या असून पारा घसरू लागल्याने आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. 

क्‍यार वादळानंतर कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण बदलले होते. दिवाळी सरून गेली तरीही थंडीचा पत्ता नव्हता. ऑक्‍टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा जोर होता. त्यानंतरही किमान तापमान खाली आले नव्हते. परिणामी आंबा बागायतदारांमध्ये चलबिचल सुरू झाली. ऑक्‍टोबर हिटच्या प्रभावातून बाहेर पडल्यानंतर हळूहळू गुलाबी थंडीला सुरवात होते. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात प्रचंड थंडी पडू लागली तरी कोकणात मात्र थंडी नव्हती. मात्र गेले दोन दिवस रात्रीच्यावेळी गारठा जाणवू लागला आहे. 

हेही वाचा - देवगड हापूसची धिमी सुरूवात 

सलग तीन दिवस किमान तापमान 20 ते 21 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. मिनी महाबळेश्‍वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत 13.5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. कमाल तापमान यंदा 27.8 असून गतवर्षी ते 32.6 इतके होते. त्यामुळे कोकणात थंडा थंडा कुल कुल वातावरण आहे. पुढील दोन दिवसात रत्नागिरीत 15 अंशापर्यंत पारा खाली घसरण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविली आहे. थंडीअभावी पालवीला मोहोर फुटण्याची क्रिया वेगाने होत नव्हती. जानेवारीला मोहोर आला तर मार्च अखेरपर्यंत आंबा तयार होईल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंब्याची आवक सुरू होईल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तुडतुडा आणि कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यावर फवारणीचा एक हात अधिक मारावा लागला आहे. 

हेही वाचा - मटण दरवाढीमागे हे आहे कारण 

तीन दिवसांत पोषक वातावरण

थंडी पडल्यामुळे फुटवा येण्यास सुरवात झाली आहे. यंदा उशिरा उत्पादन येणार असले तरीही तीन दिवसांत पोषक वातावरण तयार झाले आहे. 
- प्रसन्न पेठे, बागायतदार  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fall In Temperature In Ratnagiri Marathi News