लाच मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण? वाचा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

ही रक्कम लगेच जमा होण्यासाठी महसुलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला 5 लाख द्यावे लागतील, अशी सुरूवातीला संबंधित बॅंकेच्या एका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण भूसंपादनाच्या दुसऱ्या निवाड्यातील एका उद्योजकाच्या मंजूर झालेल्या 33 लाखाच्या रकमेपैकी 5 लाखाची मागणी महसुल विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बॅंक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मागणी केल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली. याची कसुन चौकशी झाली पहिजे, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे केली. हा प्रकार आज येथे घडला. 

पिंगुळी गुढीपुर येथील एका उद्योजकाचे महामार्ग चौपदरीकरण भूसंपादन निवाड्यातील दुसऱ्या टप्प्यातील 36 लाख रुपये मंजूर झाले होते. ही मंजूर झालेली रक्कम येथील एका बॅंकेच्या शाखेत जमा होण्याची प्रकिया सुरू होती. ही रक्कम लगेच जमा होण्यासाठी महसुलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला 5 लाख द्यावे लागतील, अशी मागणी सुरूवातीला संबंधित बॅंकेच्या एका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली.

उद्योजकाने अन्य बॅंकेचे कर्ज असल्यामुळे आपल्याला पाच लाख देणे शक्‍य नाही असे सांगितल्यानंतर ही मागणी अडीच लाखावर आली. ती मान्य झाली. या संवादाचे ध्वनीमुद्रण करण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारी अतुल बंगे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी संबंधित महसुलमधील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ही रक्कम वितरित करण्याचा विषय मांडला; मात्र याकडे दुर्लक्ष केले.

याबाबत आमदार नाईक यांनी संबंधितास धारेवर धरले. यावेळी जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, अतुल बंगे, राजन नाईक, राजू गवंडे, बाबी गुरव, राजू जांभेकर, किरण नाईक उपस्थित होते. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याची बाजू घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला असता त्यांनी मीडियाला टाळत कार्यालय गाठले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bribery case kudal konkan sindhudurg