
हजारो वर्षांची परंपरा असलेली आदिम बियाणी संवर्धन करण्याची मुळात गरजच का भासते, हे समजून घेऊया. याची सुरुवात अठराव्या शतकात इंग्रज शासनाच्या काळात झाली. त्या काळात युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीमुळे विविध उद्योगधंदे तेजीत होते. या उद्योगांना लागणारा कच्चा माल हा युरोपीय देशात त्यांच्या वसाहती असलेल्या आशिया आणि आफ्रिका देशांमधून आणला जाई. सतराव्या शतकात इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये आपले बस्तान बसवायला सुरुवात केली होती. त्यानुसार भारतात शेतकऱ्यांकडून इंग्लंडमधील कापड गिरण्या, सिगारेट कारखाने यांना लागणारा कच्चा माल म्हणजेच कापूस, ताग, नीळ, तंबाखू यासारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणला. त्याशिवाय चीनमध्ये आपला शिरकाव होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर चिनी लोकांना अफूचे व्यसन लावण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर अफू पिकवून तिची चीनमध्ये तस्करी केली जायची.
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी सृष्टिज्ञान संस्था