नेटवर्कविना अनेक अडचणी, आवाज उठवताच घेतली दखल

भूषण आरोसकर
Saturday, 5 September 2020

गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना बीएसएनएलची सेवा मिळत नव्हती. बीएसएनएलची नेटवर्क सेवा, फोन बंद असल्याने गैरसोय होत होती.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बीएसएनएल अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तर दिली गेल्याने कलंबिस्त येथील समस्यांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी आजच्या आज ठप्प असलेली सेवा पूर्ववत केली जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले. 

गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना बीएसएनएलची सेवा मिळत नव्हती. बीएसएनएलची नेटवर्क सेवा, फोन बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फ्राॅम होम असल्याने अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील लोकांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विजय कदम यांचे लक्ष वेधले होते.

याबाबत वारंवार तक्रार करून दखल न घेतल्याने कदम यांनी आक्रमक होत याचा संबंधित अधिकाऱ्याला जाब विचाराला. या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तर दिली गेल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना जाब विचारला. 
बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित अधिकाऱ्याला समज देण्यात आली.

आजच्या आज ठप्प असलेली सेवा पूर्ववत केली जाईल, असे आश्‍वासन यावेळी तेथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. या घटनेबाबत तसेच कोविड काळात यंत्रणेवर आलेला ताण, तसेच ग्राहकांची होणारी गैरसोय दूर व्हावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून निदर्शनास आणून देत जनतेला न्याय मिळवून देवू, असे मत राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले. यावेळी न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, उद्योग व व्यापारचे कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, नवल साटेलकर, पद्मराज मुणगेकर, आर्यन रेडीज आदी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bsnl service problem sawantwadi konkan sindhudurg