Ratnagiri : हायटेक बसस्थानकाचे काम लवकरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri

Ratnagiri : हायटेक बसस्थानकाचे काम लवकरच

रत्नागिरी : गेली चार वर्षे रखडलेल्या येथील हायटेक एसटी बसस्थानकाचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. ठेकेदाराला वाढीव फरक देण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली. पालकमंत्री उदय सामंत यांनीही यात लक्ष घातले आहे. काही कामगार लावून प्राथमिक कामाला सुरुवात केल्याचा दावा एसटी प्रशासनाने केला आहे. ठेकेदाराची मागणी आणि राजकीय घडामोडींमुळे रखडलेले हे काम पुढच्या महिन्यात सुरू होणार असल्याचे एसटी विभागाने सांगितले.

एसटी बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या हायटेक प्रकल्पाच्या बांधकामाला कोरोनाचा फटका बसला. त्यानंतर रेंगाळलेल्या या कामाला अजूनही गती मिळालेली नाही. कोरोना महामारीमुळे कामाला ब्रेक लागला. जनतेशी थेट संबंधित असलेला हा १० कोटींचा नूतन बसस्थानकाचा प्रकल्पाच्या कामातील विघ्ने काही संपत नव्हती.

सुरुवातीला हायटेक बसस्थानकाच्या प्रकल्पाचे सादरीकरण तत्कालीन पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर झाले. आराखड्यात काही त्रुटी निघाल्या होत्या. शॉपिंग सेंटर किंवा व्यापारी गाळे आत ठेवण्याऐवजी दर्शनी उभारून एसटी आत आणि बाहेर जाण्यासाठी मार्ग करण्याचे सुचविण्यात आले आहे. त्यानुसार नवीन आराखडा करून प्रकल्पाच्या काम सुरू करण्यात आले. कोल्हापूरच्या ठेकेदाराला याचा ठेका देण्यात आला. सुरवातीला काम चांगल्या पद्धतीने सुरू होते.

हायटेक बस स्थानक काम लवकरच

ते रेंगाळले ते अजून तसेच आहे. त्यामुळे एसटी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना थांब्यावर वाद निर्माण होत आहेत. प्रसार माध्यमांनी हा विषय उचलून धारल्यानंतर खासगी तत्वावर एक प्रवासी निवारा शेड उभारण्यात आली.

एसटी पार्किंगसाठी पालिकेकडे मागण्यात आलेली जागादेखील पालिकेने नाकारली. त्यामुळे कामाच्या ठिकाणीच गाड्या पार्किंग करून ठेवल्या जाऊ लागल्या. त्यानंतर बांधकामाची गंती मंदावली. अखेर तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून सामंत यांनी स्वतः कामाची पाहणी केली.

या वेळी ठेकेदाराची कान उघाडणी करून त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एका अधिकार्‍याची नियुक्ती केली. त्यानंतर कामाला काहीशी गती मिळाली. परंतु कोरोना महामारीचे संकट आले आणि कामाला पुन्हा खो मिळाला. जेवढे कामगार होते ते कोरोनाच्या भीतीने निघून गेले. तसेच ठेकेदाराने केलेल्या कामाचे सुमारे ४० लाखाचे बिलदेखील एसटी महामंडळाकडून रखडले होते. मात्र ते काही महिन्यापूर्वी आदा करण्यात आले.अजुनही या नुतन बसस्थानकाच्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही.