#SaturdayMotivation : फूडव्हॅनसह व्हॉटस्‌अप ग्रुपआधारे सुरु केला व्यवसाय

food van in chiplun
food van in chiplun

चिपळूण (रत्नागिरी) - शहरातील बहादूरशेख नाक्‍यावर सारिका भावे या गृहिणीने चारचाकी व्हॅनवर उत्कृष्ट नाष्टा आणि घरगुती पदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. सकाळी दोन तास ती फूडव्हॅनचा व्यवसाय करते. फूडव्हॅनचा व्यवसाय यशस्वी झाल्यामुळे सारिकाने खवय्यांचा व्हॉटस्‌ ॲप ग्रुप बनविला. त्यावर रात्री ८ वाजेपर्यंत लोक नाष्ट्याची ऑर्डर करतात. सकाळी मागणीप्रमाणे त्यांना नाष्टा उपलब्ध करून दिला जातो. उत्पन्नापेक्षा व्यवसायामुळे मिळणारे समाधान महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. 

सारिका भावेचे आर्थिक स्वावलंबन

गुहागर वरचापाठ येथील गीता व गोविंद खरे यांची मुलगी सारिका. तिचे चिपळुणातील सागर भावे या तरूणाबरोबर लग्न झाले. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर आई-वडिलांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. सागर भावे फायबरची कामे करतात. खेर्डीतील वर्कशॉपमध्ये त्याचा अंगठा कापला गेला. या आघातातून बोध घेत सारिका हिने स्वतःच्या पायावर उभे राहात आई-वडिलांचा व्यवसाय बहादूरशेख नाक्‍यावर सुरू केला. 

सारिकाच्या फुडव्हॅनची वाट बघत असतात लोक

 भावे कुटुंबात व्यवसाय सुरू करणारी सारिका पहिलीच महिला. पहाटे चार वाजता उठून ती नाष्टा बनवते. चारचाकी व्हॅन स्वतः चालवत ती बहादूरशेख नाक्‍यावर सकाळी ६.३० वाजता पोहचते. बहादूरशेख नाक्‍यावरील सामान्य कामगार आणि प्रवासी आपले ग्राहक असतील असे सारिकाला वाटले होते. परंतु तिच्याकडे असलेले अन्नपदार्थ बिन तळलेले, घरगुती आणि चविष्ट असल्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणारे उच्च व मध्यमवर्गीय लोकही नाष्ट्यासाठी सारिकाच्या फुडव्हॅनची वाट बघत असतात. तिच्याकडे नारळही विक्रीला असतात. डब्यातून आणलेले अन्नपदार्थ ती व्हॅनमध्येच ठेवते. त्यामुळे धुळीचा त्रास होत नाही.

मला व्यवसायात यश मिळवायचे होते. यासाठी स्कूल बस, स्विमिंग ट्रेनरच्या पर्यायाची चाचपणी केली होती. परंतु केटरिंगचा पूर्वीपासून अनुभव असल्यामुळे या व्यवसायात उतरले. सुरवातीला खूप त्रास झाला. अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु नवऱ्याची साथ होती. अगदी भांडी घासण्यापर्यंत नवऱ्याने सहकार्य केले. त्यामुळे यश मिळवले. - सारिका भावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com