समुद्र किनाऱ्यावरील व्यावसायिकांना 'अच्छे दिन' 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी गर्दी दिसू लागली असून, किनाऱ्यावरील व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ 
येत आहेत.

रत्नागिरी : कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले. रत्नागिरीकर मोकळा श्‍वास घेण्यासाठी भाट्ये, मांडवी किनारा गाठू लागले आहेत. पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी गर्दी दिसू लागली असून, किनाऱ्यावरील व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ 
येत आहेत.

मार्चमध्ये कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरवात केली आणि टाळेबंदी जाहीर झाली. कडक नियमांमुळे रस्त्यावर कोणीही दिसत नव्हते. रस्ते, किनारे, मंदिरे, बाजारपेठा सुनीसुनी झाली होती. कोरोनाच्या भीतीमध्ये लोकांचा चांगलाच कोंडमारा झालेला होता. ऑक्‍टोबरमध्ये कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढले. लोकांमधील भिती हळूहळू कमी होऊ लागली.

हेही वाचा - शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष भाजपच्या वाटेवर -

नोकरी, व्यावसायिक वगळता अन्य लोकांचा घरातून बाहेर पडण्याचा टक्‍का कमी होता. व्यवहार सुरळीत होऊ लागले असून लोकांमधील भीतीने आता सुरक्षिततेची जागा घेतली आहे. कोरोनातील परिस्थितीमुळे पर्यटक सोडाच स्थानिक लोकही फिरण्यासाठी बाहेर पडत नव्हते. त्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये, मांडवी हे नेहमी गजबजलेल्या किनाऱ्यांवर शुकशुकाट होता. गेल्या पंधरा दिवसांमध्ये ही परिस्थिती बदलली असून कोरोनातील टाळेबंदीमुळे घुसमटलेले नागरिक फिरण्यासाठी किनाऱ्यांकडे वळू लागलेले आहेत. 

कुटुंबीय लहान मुलांना घेऊन भाट्ये, मांडवी किनारी फिरण्यासाठी गर्दी करु लागले आहे. त्यामुळे किनाऱ्यावर असलेल्या फेरीवाल्यांचे उत्पन्न सुरू झाले आहे. नारळपाणी, भेळ यासह विविध वस्तूंची विक्री करणाऱ्यांची चलती आहे. गेले सहा महिने त्यांचे उत्पन्नच थांबलेले होते. 

हेही वाचा - ‘इशारे पे इशारे’ ; राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेत चुरस -

सुरक्षिततेकडे होतेय दुर्लक्ष

किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या ५० टक्‍के लोकांकडून मास्क, सॅनिटायझरचा वापर होतो; परंतु तरुण वर्ग याकडे कानाडोळा करीत आहे. कोरोनाचे रुग्ण रत्नागिरीत कमी असले तरी अजूनही सावट आहेच.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: businessman or sole traders in sea shore in ratnagiri increased day by day in ratnagiri after corona