....अन्यथा तुमचा व्यवसाय होईल बंद ; का ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

ज्यांनी चाचणी केली आहे, त्यानांच व्यवसायाची परवानगी द्या, असा सूर सोशल मीडियावर उमटू लागला आहे.

चिपळूण : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट व्यापाऱ्यांच्या दारात कोरोनासाठी अँटिजेन टेस्ट केली जात आहे. त्यास व्यापाऱ्यांकडून अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. शहरातील अनेक बडे व्यापारी, दुकानदार आणि त्यांच्या दुकानातील कामगार हे तपासणी व्हॅनकडे फिरकलेले नाहीत. ज्यांनी चाचणी केली आहे, त्यानांच व्यवसायाची परवानगी द्या, असा सूर सोशल मीडियावर उमटू लागला आहे.

हेही वाचा - मोबाईल व्हॅन तुमच्या दारी, अँटिजेन तपासणी करुन घ्या सारी 

 

गेल्या ४ दिवसांपासून शहरात कोरोनासाठी व्यापारी, दुकानदार व त्यांच्या कामगारांची व्यापाऱ्यांच्या दारात जाऊन अँटिजेन टेस्ट केली जात आहे. काही दुकानदार, व्यापारी, विक्रेते त्वरित तपासणीला पुढे येतात तर काहीजण मोबाईल व्हॅन व अधिकारी येत असल्याचे समजताच दुकान बंद करून निघून जातात. अनेक व्यापाऱ्यांनी खबरदारी बाळगलेली नाही. मास्कचा वापर न करताच विक्रेते बिनधास्त व्यवसाय करीत असल्याने लोक संतापही व्यक्त करीत आहेत.

ज्या दुकानात खरेदीसाठी ग्राहकांची नेहमी गर्दी होते, त्यांच्याकडे कामगारांची संख्याही अधिक आहे. अशा काही दुकानदारांच्या मालकांनीही अद्याप चाचणी केलेली नाही. ज्या दुकानात कामगार, मालक बाधित निघाले, तेथील दुकाने बंद ठेवलेली नाहीत. त्यांचे सुरळीत व्यवसाय सुरू आहेत. एखादा व्यापारी दुकानदार बाधित आढळला तरी त्यांचे दुकान सील केले जात नाही अथवा त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले जात नाही. बाधित आढळल्यास व्यवसाय बंद राहील, ग्राहक खरेदीसाठी येणार नाहीत. या भीतीपोटीच व्यापारी, दुकानदार त्वरित तपासणीला पुढे येत नाहीत.

हेही वाचा -  कारभारीच प्रभारी ; संगीत खुर्चीच्या खेळाला आलाय बहर अन् डॉक्टर गेले रजेवर

 

"व्यापारी, दुकानदार व त्यांच्या कामगारांसाठी प्रशासनाने अँटिजेन तपासणीची सुविधा केली आहे. या तपासणीची भीती बाळगू नये. सहकार्य करावे."

- डॉ. ज्योती यादव, तालुका आरोग्य अधिकारी

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: businessman people compulsory antigen test in ratnagiri with the help of mobile van