मोबाईल व्हॅन तुमच्या दारी, अँटिजेन तपासणी करुन घ्या सारी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

‘लवकर निदान, लवकर उपचार’ अशा या मोहिमेत आरोग्य विभागामार्फत ‘कोरोना तपासणी आपल्यासाठी’ उपक्रम राबवला जात आहे.

रत्नागिरी : कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. ‘लवकर निदान, लवकर उपचार’ अशा या मोहिमेत आरोग्य विभागामार्फत ‘कोरोना तपासणी आपल्यासाठी’ उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये मोफत अँटिजेन तपासणीसाठी दोन ‘मोबाईल व्हॅन’ रत्नागिरी शहरासह परिसरात तैनात केल्या आहेत. गर्दी आणि हॉट झोनमध्ये अँटिजेन तपासण्या होणार आहेत.

हेही वाचा -  विकेल ते पिकेल साठी झाली कोकणातील या पाच जिल्ह्यांची निवड

बाधितांचा आकडा पाच हजारांवर पोचला आहे. आतापर्यंत ६० टक्‍के रुग्ण बरे झाले आहेत; मात्र मृत्यूदर तीन ते साडेतीन टक्‍क्‍यांपर्यंत आहे. गेल्या काही दिवसांत हा दर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मोफत अँटिजेन तपासणीसाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी मोबाईल व्हॅनद्वारे दोन पथके कार्यरत झाली आहेत. ही पथके कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्यांची तपासणी करतील.

शहर आणि परिसरातील कोरोना हॉट झोनमधील गर्दीची ठिकाणे निवडून तेथील स्वयंस्फूर्तीने आलेल्या लोकांची तपासणी केली जाईल. त्वरित निदान झाल्यामुळे उपचार करणे शक्‍य असून मृत्यूपर्यंत जाणाऱ्या रुग्णांचा आकडा कमी होऊ शकतो. ही दोन फिरती पथके नियुक्त आहेत. बुधवारी (९) या व्हॅन कार्यरत झाल्या आहेत. रत्नागिरीत कोकणनगर येथे २५, तर आठवडा बाजार येथे २५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांत दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. शहरातील बाजारपेठ परिसरात व्यापाऱ्यांच्या तपासणीसाठी एक पथक कार्यरत आहे. चिपळुणातही एक पथक कार्यरत आहे.

हेही वाचा - बनावट ग्राहक बनून या दुर्मिळ प्राण्याची तस्करी रोखली 

"मोबाईल व्हॅनसाठी दोन पथके नियुक्‍त केली आहेत. या माध्यमातून दररोज कोरोनाच्या निदानासाठी चाचणी केली जाईल."

-डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for checking a people antigen test for free to hotspot area in ratnagiri