कोकणकरांनो सावधान ; अन्यथा तुमची दुकाने होणार सील

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

शहरवासीयांनी समाजमाध्यमांवर झोड उठवली आहे.

चिपळूण : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. तो रोखण्याच्या हेतूने शहरातील व्यापाऱ्यांची अँटिजेन चाचणी करण्याचे काम सुरू आहे. यासाठी प्रशासनाने तपासणीसाठी मोबाईल व्हॅन व्यापाऱ्यांच्या दारात पाठवली तरी त्यास व्यापाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. काहींना जबरदस्ती केल्यावर ते चाचणीस तयार होत आहेत. अनेक व्यापारी, दुकानदार मास्क वापरत नाहीत. यावर शहरवासीयांनी समाजमाध्यमांवर झोड उठवली आहे. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करा, दुकानेच सील करा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा - ब्रिटीशकालीन काम अन् आताच्या कामाची होतेय तुलना, कारण...

चिपळूण शहरात जवळपास लहानमोठी ३५०० दुकाने आहेत. शहरासह परिसरातील व तालुक्‍यातील लोक येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे बाजारपेठेत नेहमीच लोकांची गर्दी असते. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास येथील गर्दी कारणीभूत ठरते. शहरातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रांत पालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या साथीने बाजारपेठेत अँटिजेन टेस्ट सुरू केल्या. शनिवारपासून (५) या चाचणीला सुरवात झाली. बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन चाचणी करणे अपेक्षित होते.

प्रशासनाने आवाहन केल्यानंतरही व्यापारी तपासणीला पुढे येत नव्हते. माजी नगरसेवक अरुण भोजने, पालिकेचे अधिकारी आदींनी आवाहन केल्यानंतर काहीजण दुकानातून चाचणीसाठी बाहेर पडले. काहींना दम भरल्यानंतर ते चाचणीला तयार झाले. गेल्या दोन दिवसांत सुमारे २०० जणांची तपासणी झाली. यामध्ये १५ जण बाधित निघाले आहेत. बाजारपेठेतील अनेक दुकानदार, व्यापारी, भाजीपाला व फळ विक्रेते मास्क वापरत नाहीत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारायला हवा, असा सूर उमटत आहे. 

ठळक बाबी...
मोबाईल व्हॅन 
दारी येऊनही पाठ
काहींना व्यापाऱ्यांनीच भरला दम
शहरामध्ये सुमारे 
३५०० दुकाने
प्रशासनही होतेय हतबल

हेही वाचा -  पार्थिव दफन प्रकरणाचा चेंडू प्रांताधिकाऱ्यांच्या कोर्टात, लवकरच निर्णय शक्य

"कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तपासणीला वास्तविक व्यापाऱ्यांनीच पुढाकार घ्यायला हवा. अनेकांना आवाहन केले तरी ते दाद देत नाहीत. आपल्या कुटुंबाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतःहून चाचणी करून घेणे गरजेचे आहे." 

- अरुण भोजने, व्यापारी

"शहरातील फळविक्रेते, भाजीपाला व्यावसायिक, दुकानदार मास्क न वापरताच व्यवसाय करतात. अशांवर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली तरच डॉक्‍टर आणि प्रशासनाला सहकार्य केले असे म्हणता येईल." 

- रसिका देवळेकर, नगरसेविका, चिपळूण

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: businessman people do not ready for antigen test causes citizens demanded to seal the shop in ratnagiri