भरघोस उत्पन्न देणाऱ्या अमेरिकन फळाची आता कोकणात होणार लागवड  

धनाजी सुर्वे 
Thursday, 14 January 2021

अव्होकाडो हे मुळचे अमेरिकेचे फळ असून त्याला बाजारात मोठी मागणी आहे

रत्नागिरी : महाराष्ट्रात अव्होकाडो (लोणी फळ) फळाच्या लागवडीला चालना देण्यात येत असून दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात या संदर्भात प्रायोगिक तत्त्वावर लागवडीचा प्रयोग केला जाणार आहे. जगाच्या पाठीवर कृषी क्षेत्रात जे संशोधन आहे त्याचाच भाग म्हणून या लागवडीकडे पाहिले जात आहे. कोकणात या फळाची लागवड यशस्वी झाल्यास मोठी क्रांती ठरेल, असा विश्वास कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे.

मंत्रालयात या संदर्भात आज बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत आदी यावेळी उपस्थित होते. न्युट्रीफार्म ॲग्रीकल्चर कंपनीमार्फत या संदर्भात सादरीकरण करण्यात आले.

अव्होकाडो हे मुळचे अमेरिकेचे फळ असून त्याला बाजारात मोठी मागणी आहे. भारतीय ग्राहकांमध्ये अद्याप त्याचा प्रसार कमी असून आरोग्याच्या दृष्टीने या फळाचा आहारात समावेश केल्यास फायदा होतो. 

या फळात ऊर्जा मोठ्या प्रमाणात असून रक्तातील साखर वाढू न देता ऊर्जा देण्याचे काम केले जाते. त्याचबरोबर या फळात प्रथिने जास्त आणि कर्बोदके कमी असतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे फळ असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सद्या भारतात या फळाची उलाढाल 50 कोटी रुपयांच्या आसपास असून सुधारित जातीच्या लागवडीची निर्यात केल्यास अधिक उत्‍पन्न मिळू शकते.

हे पण वाचाहाडांच्या आरोग्यासाठी सोप्या थेरपींचा मंत्र

 

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी जगाच्या पाठीवर जे काही उत्कृष्ट संशोधन आहे त्याचा वापर केला पाहिजे. कोकणतील हवामान या फळाला पोषक असून त्याची लागवड यशस्वी झाल्यास कृषी क्षेत्रात क्रांती ठरेल. फळांमध्ये निसर्गाने दिलेला जो जुना ठेवा आहे त्याची जपणूक करण्याचे बैठकीत सूचित केले. जांभूळ, फणस या फळांकडे पुरेसे लक्ष देण्याचेही आवाहन यावेळी कृषीमंत्र्यांनी केले.


 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Butter Fruit Avocado Nutrition Health Benefits Dapoli Doctor Balasaheb Sawant at Konkan Agricultural University farmer minister dada bhuse