आंब्यावर होतोय कार्बाईडचा मारा?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

'घातक रसायनांद्वारे पिकविलेले आंबे खाल्ल्याने आतडीवर सूज येणे, गळ्यात खवखव होणे, उलट्या होणे असे प्रकार घडू शकतात. नागरिकांनी शक्‍यतो पिवळेधमक दिसणारे आंबे घेऊ नयेत. घातक रसायनांचा वापर करून पिकविलेले आंबे घेणे टाळावे.' 
- डॉ. विलास पालांडे, वैद्यकीय अधिकारी, चिपळूण

चिपळूण : आंब्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक विक्रेत्यांनी आंबा पिकण्यासाठी कार्बाईडचा मारा सुरू केल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने पाहणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. 

जिल्ह्यात कर्नाटकसह अन्य राज्यांतून शेकडो टन कच्चा आंबा मागविण्यात आला आहे. कमी कालावधीत फळ पिकवणे कठीण असल्याने अनेक विक्रेत्यांनी घातक रसायनाचा वापर सुरू केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत तसेच शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

रसायन मारलेला आंबा कोणता आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबा कोणता हे ग्राहकांना समजत नसल्यामुळे ग्राहकही सैरभेर झाले आहेत. रसायनाचा वापर करून आंबे पिकविल्यास ते लक्षात येत नाही. नमुने घेऊन तपासणी केल्यानंतरही रसायन वापरल्याचे अनेकदा स्पष्ट होत नाही. त्यामुळे आंबे पिकविताना जर त्या ठिकाणी कार्बाईडच्या पुड्या सापडल्यास तो आंबा त्याच्या मदतीने पिकविला आहे हे सिद्ध होते.

विविध प्रकारची फळे पिकविण्यासाठी बहुतांश कार्बाईड या घातक रसायनाचा वापर होतो. पूर्वीच्या द्रव्य स्वरूपात येणाऱ्या कार्बाईड आता पुडीच्या स्वरूपात येत आहे. ही पुडी फळाच्या बाजूला ठेवली, की फळे काही तासांत पिकलेली दिसतात. अक्षय्य तृतीयेला विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीसाठी उपलब्ध व्हावा म्हणून कार्बाईड या घातक रसायनाचा वापर झाल्याची चर्चा आहे. या रसायनाच्या पुड्या ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. याशिवाय या घातक द्रावणाची आंब्यावर फवारणी केली जात असल्याचे समजते. 

दरम्यान, येथील विविध भागांत अशा पद्धतीने आंबे पिकविण्याचे गोदाम असून, या भागातून गेल्यास उग्र स्वरूपाचा वास येतो. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विक्रेत्यांच्या गोदामांवर अन्न व औषधी प्रशासनाने छापे मारावेत, गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Carbide is being used to ripe mangoes