बिबट्याची हुल ; सहा दिवस गस्त मात्र पुन्हा एकदा केली त्याने मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 case attacked by a leopard farmer Janardan Chandurkar from Mervi-Jambul Aad in Ratnagiri taluka

स्थानिक लोकांना मात्र बिबट्याचे दर्शन

 

बिबट्याची हुल ; सहा दिवस गस्त मात्र पुन्हा एकदा केली त्याने मात

पावस (रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी-जांभूळ आड येथील जनार्दन चंदुरकर या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पुणे आणि मुंबई येथून आलेल्या पथकाला आठवडाभरात बिबट्याचे साधे दर्शनही झाले नाही. बिबट्याने हुल दिल्याने रविवारी हे पथक रिकाम्या हाताने माघारी परतले आहे. 


गंभीर जखमी झालेल्या इसमावर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केल्यानंतर जनार्दन चंदुरकर 5 सप्टेंबरला सकाळी सहा वाजता आंबा बागेमध्ये गुरे चरण्याकरता सोडून घरी जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये ते जखमी झाले. ते निपचित पडून राहिल्याने बिबट्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या बछड्याकडे लक्ष दिल्याने चंदुरकर बचावले होते. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर जवळच असलेल्या गुराख्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिस पाटील जयंत फडके यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा- चाकरमान्यांनो, कृषी पर्यटनाच्या नव्या धोरणांचे करा स्वागत -

पथके हात हलवत माघारी​

वनविभागाने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.त्यानंतर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी व लोकांची सुरक्षितता जपण्यासाठी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पथक व पुणे येथील एक पथक जांभूळआड परिसरात 7 सप्टेंबरला दाखल केले. त्यांनी परिसरामध्ये कॅमेरा व पिंजरा बसविला. तसेच वनविभागाने गस्त घालण्यास सुरवात केली.

कॅमेर्‍यात फक्त भेकरे, साळिंदर

दरम्यान लावण्यात आलेल्या पिंजर्‍याकडे बिबट्या फिरकलाही नाही; मात्र त्याचवेळी स्थानिक लोकांना मात्र बिबट्याचे दर्शन झाले. कॅमेर्‍यामध्ये भेकरे, साळिंदर, ससा अशा प्रकारचे प्राणी रात्रीच्यावेळी फिरताना दिसले. परंतु ज्या बिबट्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले होता, तो बिबट्या कुठेही दिसलेला नाही. सहा दिवस रात्रीच्यावेळी व दिवसा अनेक भागात गस्त घालूनही बिबट्या हाती आलेला नाही. त्यामुळे वनविभागाची ही दोन्ही पथके आज पहाटे (ता. 13) मुंबई व पुणे येथे रवाना झाली. त्यामुळे पुन्हा एकदा बिबट्याने वनविभागावर मात केल्याची खुमासदार चर्चा या परिसरात सुरू आहे.

हेही वाचा- खुशखबर : शेतकर्‍यांनो आता तुमच्या बँक खात्यात पैसे होणार जमा.  - ​

शासनाचा खर्च वाया गेला

बिबट्याचा संचार कायम राहण्याची शक्यता येथील स्थानिकानी व्यक्त केली. त्याला जेरबंद करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या पथकाला काहीच सापडले नसल्याने अखेर हात हलवत परत जाण्याची वेळ आली. त्यामुळे यावर केलेला शासनाचा खर्च वाया गेला.

संपादन- अर्चना बनगे