अवघ्या १२ तासांत पोलिसानी लावला छडा : झोपेतच आवळला कारमध्येच गळा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

दोघांना अटक; सुनेत्रा दुर्गुळे खून प्रकरण

गुहागर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील वेलदूर येथील शाखा व्यवस्थापिका सुनेत्रा दुर्गुळे खून प्रकरणी अवघ्या १२ तासांत पोलिसानी संजय श्रीधर फुणगूसकर (वय ४०) व सत्यजित बबन पटेकर (३२, दोघेही रा. नवानगर) या दोन संशयितांच्या मुसक्‍या आवळल्या. न्यायालयाने फुणगूसकरला २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले; तर पटेकरची आरोग्य तपासणी 
करण्यास सांगितले. प्राथमिक चौकशीच्यावेळी संजयने मी सुनेत्रा यांना शृंगारतळी येथे सोडले एवढेच सांगितले होते;

मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलवरील संभाषण आदी धागेदोरे मिळवले होते. पोलिसी खाक्‍या दाखवल्यावर संजयने सांगितले, की बुधवारी (ता. १६) सायंकाळी संजय फुणगूसकर आपल्या कारमधून सुनेत्रा दुर्गुळे यांना घेऊन शृंगातरळीला आला. दोघेही श्रृंगारतळीत चहा प्यायले. त्यानंतर श्रृंगारतळीतील एकादुकानात संजयने टीव्ही खरेदी केला. तो नवानगरला त्याच्या घरी पाठवून दिला. याच दरम्यान सुनेत्रा यांनी लेकीला फोन करून मला संजय चिपळूणला सोडत असल्याचे सांगितले. या वेळी संजयला शृंगारतळी येथे सत्यजित पटेकर भेटला. तो सोबत निघाला. त्यानंतर चिपळूणला न जाता संजयने कार कारूळ फाट्यावरून आत नेली.

हेही वाचा- जनता कर्फ्यूचा निर्णय जनतेवरच -

निर्जन रस्त्यावर लघवीच्या बहाण्याने दोघे थांबले. सुनेत्रा झोपल्याची संधी साधून कारमध्ये त्यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर दोघेही श्रृंगारतळीला आले. एका बारमधून बियर घेतली. गाडी नवानगरकडे वळवली. नवानगर तरी जेटीजवळील चढात गाडी लावून दोघांनी सुनेत्राचे प्रेत बाहेर काढले. दोरी कमरेला व मांड्यांना बांधली. दोरीला दोन मोठे दगड बांधले आणि तरी जेटीजवळ प्रेत दाभोळच्या खाडीत फेकून दिले. फुणगुसकर याने पटेकर याला सोबत घेऊन पैशांसाठी सुनेत्राचा खून केल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना गुरुवारी ( १७) रात्री १.३१ वा. अटक करण्यात आली. 

मोबाईल सीडीआरचे विश्‍लेषण
या प्रकरणात पोलिस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांनी गुहागर पोलिसांसह तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. दाभोळ खाडीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन होईपर्यंत विविध मार्गाने माहिती संकलन सुरू केले. सुनेत्रा यांच्या मोबाईल सीडीआरचे विश्‍लेषण करण्यात आले. नातेवाइकांकडून माहिती घेण्यात आली. सुनेत्रा यांनी संजय फुणगुसकर यांच्यासोबत वेलदूर ते शृंगारतळी असा प्रवास केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे फुणगूसकर यांच्या मोबाईल सीडीआरचेही विश्‍लेषण केले. 

हेही वाचा-सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर स्थायी सभेत ओढले ताशेरे -

संजय फुणगूसकर सराफ
संजय फुणगूसकर हा विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक शाखा वेलदूरसाठी सराफाचे काम करीत होता. सुनेत्रा यांनी सोन्याच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये आणलेले होते. त्याच्या हव्यासापोटी दोघांनी खून केला. पोलिस उपनिरीक्षक किरणकुमार कदम यांच्यासह गुहागर पोलिस व उपविभागीय पोलिस कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याची चौकशी केली. 

संपादन -  अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case of Sunetra Durgule branch manager at Veldur Police in just 12 hours in the Both arrested