
वैभववाडी : लांबलेला पाऊस, त्यानंतर अवकाळी पाऊस आणि सतत ढगाळ वातावरण या संकटचक्रातून तारेवरची कसरत करीत मार्गक्रमण करीत असलेल्या काजू बागायतदारांमागचे शुक्लकाष्ठ संपण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार वाऱ्याचा काजू बागांना तडाखा बसला असून, मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वाचे मानलेले काजू पिक तीन - चार वर्षांत संकटचक्रात अडकले असून, काजू बागायतदार त्यात होरपळले जात आहेत. यावर्षी ऑक्टोबरमध्येच अनेक ठिकाणी काजूला चांगला मोहोर आला. परंतु, मॉन्सून लांबल्यामुळे हा मोहोर वाया गेला. त्यानंतर सतत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने थैमान घातले. संपूर्ण नोव्हेंबर महिना आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला. त्याचा परिणाम काजू पिकावर झाला. त्यानंतर थंडी पडली. बागायतदारांनी विविध फवारण्या घेतल्या. त्यामुळे काजू बागांना पुन्हा पालवी आणि मोहोर आला. त्यातच पुन्हा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा अवकाळी पाऊस झाला. दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहिले. त्याचा फटकादेखील काजू बागांना बसला. संकटचक्राची ही मालिका सुरू असतानाच २८ आणि २९ जानेवारीला जिल्ह्यात जोरदार वारे वाहू लागले. सह्याद्री पट्ट्यात या वाऱ्याचा वेग प्रचंड होता. झाडे अक्षरक्षः पिळवटून टाकली जात होती. वाऱ्याचा हा तडाखा काजू पिकाला सहन झाला नाही. या वाऱ्यात काजूच्या झाडांना आलेला मोहोर, फळे आणि पानेदेखील वाऱ्यामुळे गळून पडली आहेत. काही ठिकाणी कच्चा काजू मोठ्या प्रमाणात गळून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
संकटामागुनी संकट
२०१९ मध्ये कोरोनामुळे काजूचे दर गडगडले. ६० ते ७० रुपयांवर आले. त्यानंतर २०२० मध्येदेखील कोरोनाचा फटका बसला. एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे कृत्रिम संकटे यामध्ये शेतकरी कोलमडून गेला आहे.
या भागांत मोठे नुकसान
करूळ, कुंभवडे, नावळे, शिराळे, सडुरे, खांबाळे, आर्चिणे, सांगुळवाडी, कुर्ली (ता. वैभववाडी) घोणसरी, फोंडा, हरकुळ, नरडवे, नाटळ, भिरवंडे (ता. कणकवली) या भागातील अनेक बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
बदलत्या वातावरणाचा फटका गेल्या काही वर्षांपासून काजू पिकाला बसत आहे. त्यामुळे भविष्यात द्राक्ष, डाळिंब पिकाप्रमाणे काजू पिकाची काळजी घ्यावी लागणार आहे. याशिवाय काजू व्यवस्थापनावरील खर्च वाढत असल्यामुळे काजूला अधिक दर मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
- प्रा. विवेक कदम, काजू अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.