किल्ले रायगडावर तिथीनुसार राज्याभिषेक दिन साजरा; सोहळ्याला वरुणराजाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

वरुणराजाने आसमंतातून केलेला जलाभिषेकाच्या साक्षीने किल्ले रायगडावर आज (शनिवार) तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला.

महाड : शिवकालीन पांरपरिक वेशभूषेतील शिवप्रेमी, वाऱ्याने फडकणारे भगवे ध्वज, ढोलताशांच्या गजरात होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा वातावरणात जाणत्या राजाच्या प्रतिमेवर जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर वरुणराजाने आसमंतातून केलेला जलाभिषेकाच्या साक्षीने किल्ले रायगडावर आज (शनिवार) तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला.

शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकणकडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीप्रमाणे आज (शनिवार) हा सोहळा पार पडला. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या धो-धो पावसात हजारो शिवप्रेमींनी मोठया उत्साहात या सोहळयाला हजेरी लावली होती. कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, स्वागताध्यक्ष आमदार भरत गोगावले, आमदार रुपेश म्हात्रे, आमदार बालाजी किणीकर, आमदार प्रशांत ठाकूर, समितीचे अध्यक्ष सुनिल पवार, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आप्पा परब व मुंबई येथील मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष धनावडे, कोकणकडा मित्र मंडळाचे सुरेश पवार उपस्थित होते.

रायगडावरील मेघडंबरी फुलांनी सजवण्यात आली होती. 14 आणि 15 जून या दोन दिवशी गडावर विविध धार्मिक विधी, पूजापाठ, वेद-मंत्रघोशाने रायगडावर मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. गडावरील विविध देवी-देवतांची विधीवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार या मिरवणूकीत महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला सुरूवात झाली. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आप्पा परब यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. नंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर सप्तसिंधूंच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष धनावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

सूर्योदयाच्या वेळीचे अल्हादायक वातरवरण आणि शिवप्रेमींमधील अलोट उत्साह यामुळे रायगडावर वेगळेच उल्हासित वातावरण निर्माण झाले होते. रायगडावर पडणारा पाऊस आणि दाट धुक्याने दाटलेल्या किल्ले रायगडच्या मंगलमय वातावरणात सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेकाच्या धार्मिक विधीना सुरूवात झाली. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात वेदउच्चारासोबत सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सिंहासनाधिष्टीत करण्यात आली. सिंहासनावर आरूढ झालेल्या महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. हा क्षण उपस्थित शिवप्रेमींची उत्कंठा शिगेला नेउन ठेवणारा होता. शिवप्रतिमेची पालखी वाजत गाजत जगदिश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली.

रायगडासह राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. तसेच रायगडासह पाचाड व अन्य स्थळांचे संवर्धन करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. तसेच आमदार गोगावले यांनी पंढरीच्या वारीप्रमाणेच असलेली रायगडवारी ही कर्तव्यपूर्तीची वारी असल्याचे यावेळी बोलताना म्हटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate the coronation day on the fort Raigad