कोकणातील केंद्रातच सीईटी; आयुक्तांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

श्री. राऊत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे श्री. सामंत यांनी राज्य सामाईक परीक्षा केंद्रास दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सीईटीच्या संबंधित 177 विद्यार्थ्यांचे कोल्हापूर हे परीक्षा केंद्र बदलून सिंधुदुर्गातच देण्यात आले आहे. याबाबतची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा केंद्राच्या आयुक्तांनी दिली आहे. 

मालवण ( सिंधुदुर्ग) - सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) जिल्ह्यात कणकवली व कुडाळ या दोन केंद्रावर अपुऱ्या आसन व्यवस्था व तांत्रिक बाबींमुळे जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथे परीक्षा द्यावी लागत असल्याचे गाऱ्हाणे संबंधित विद्यार्थ्यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे मांडले. त्यानंतर खासदार राऊत यांनी याबाबत स्वतः लक्ष घालत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला.

श्री. राऊत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे श्री. सामंत यांनी राज्य सामाईक परीक्षा केंद्रास दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सीईटीच्या संबंधित 177 विद्यार्थ्यांचे कोल्हापूर हे परीक्षा केंद्र बदलून सिंधुदुर्गातच देण्यात आले आहे. याबाबतची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा केंद्राच्या आयुक्तांनी दिली आहे. 

सीईटी राज्यात 12 ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. जिल्ह्यात सीईटीसाठी कणकवली व कुडाळ ही दोन परीक्षा केंद्रे असताना सध्याच्या कोरोना महामारी काळात जिल्ह्याबाहेर परीक्षा केंद्र देणे धोकादायक असल्याने याबाबत विद्यार्थी व पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत विद्यार्थी व पालकांनी खासदार राऊत यांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन खासदार राऊत यांनी तातडीने याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून संबंधित विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच परीक्षा केंद्र देण्याची विनंती केली होती. 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा केंद्राच्या आयुक्तांनी संबंधित विद्यार्थ्यांना कोल्हापूर ऐवजी जिल्ह्यातच परीक्षा केंद्र देण्यात आल्याचा निर्णय देत विद्यार्थ्यांना परिक्षेबाबत माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग बरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही रत्नागिरीतच परीक्षा केंद्र दिले आहे. 

तक्रारीसाठी ईमेलवर संपर्काचे आवाहन 
विद्यार्थ्यांना देण्यात आलेले जुने हॉल तिकीट हे रद्दबातल केले आहे. नवीन हॉल तिकीट विद्यार्थ्यानी mhtcet2020.mahaonline.gov.in ह्या संकेत स्थळावर लॉग इन करून प्राप्त करून घ्यावे. बदलण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांबाबाबतची माहिती एस एम एस आणि ईमेलद्वारे संबंधित विद्यार्थ्याला महाऑनलाईन संस्थेमार्फत पाठविण्यात येईल. विद्यार्थ्यांना काही माहिती अथवा तक्रार असल्यास maharashtra.cetcellgmail.com ह्या ईमेल वर संपर्क करावा, असेही नमूद केले आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CET In Center Of Konkan Information Of Central Commissioner