राजापूर पंचायत समितीमध्ये  सभापती, उपसभापती बदलाचे वारे 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

गेल्या दशकभरापासून पंचायत समितीवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व आहे. सद्यस्थितीमध्ये पंचायत समितीच्या बारा सदस्यांपैकी नऊ सदस्य शिवसेनेचे आहेत. तर, दोन राष्ट्रवादी आणि एक कॉंग्रेसचा आहे.

राजापूर ( रत्नागिरी ) - पंचायत समितीतील सत्ताधारी शिवसेनेमध्ये सभापती आणि उपसभापती बदलाचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेनेच्या गोटामध्ये त्यांचे राजीनामे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याबाबत शिवसेनेच्या बैठकीत चर्चा झाली. सद्यस्थितीमध्ये दोन्ही पदाधिकारी राजीनामे देण्यास नाखुश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सेना नेतृत्व दोघांचेही राजीनामे घेवून पदाधिकारी बदलणार की विद्यमान सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण करण्याची संधी देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

गेल्या दशकभरापासून पंचायत समितीवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व आहे. सद्यस्थितीमध्ये पंचायत समितीच्या बारा सदस्यांपैकी नऊ सदस्य शिवसेनेचे आहेत. तर, दोन राष्ट्रवादी आणि एक कॉंग्रेसचा आहे. शिवसेनेंतर्गंत पूर्वी झालेल्या निर्णयानुसार सभापतीपदी विशाखा लाड आणि उपसभापतीपदी प्रकाश गुरव यांना गतवेळी संधी देण्यात आली.

त्यानंतर, आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या उद्देशाने विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या बदलाच्या हालचाली शिवसेनेच्या गोटामध्ये सुरू झाल्या आहेत. गत महिन्यामध्ये शिवसेनेच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्याबाबत चर्चा होवून पदाधिकारी बदलावर शिक्कामोर्तब झाल्याचे सेनेच्या गोटातून सांगितले जाते. यामध्ये सभापतींचा अगोदर तर, काही दिवसानंतर उपसभापतींचा राजीनामे घ्यायचे निश्‍चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्यापही सभापती लाड आणि उपसभापती गुरव यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिलेले नाहीत. याबाबत पंचायत समितीच्या राजकीय वर्तुळातून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. 

दरम्यान, विद्यमान सभापती आणि उपसभापती पदाधिकाऱ्यांना सव्वा वर्षाचा कालावधी दिला गेल्याचे सांगितले जात आहे. हा कालावधी अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देण्यास दोन्ही पदाधिकारी नाखुश आहेत. त्याचवेळी संघटनेचा आदेश पाळून एक पदाधिकारी राजीनामा देण्यास तयार असून एक राजीनामा देण्यास तयार नसल्याचीही चर्चा आहे. त्यातून राजीनामे घ्यायचे असतील तर, दोघांचेही घ्या, अशी काहीशी भूमिका पुढे आल्याचे समजते. सभापती-उपसभापती बदलाच्या अनुषंगाने सेनेच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यावर भाष्य करण्यास त्यांच्याकडून टाळले जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chairman Deputy Chairman Change Movement In Rajapur Panchayat Samiti