तळकोकणात पर्यटन सुरु करायचेय पण या आहेत अडचणी.....

प्रशांत हिंदळेकर
Saturday, 5 September 2020

अनेक संकटे ः शासनाकडून भक्कम साथ मिळण्याची अपेक्षा

मालवण (सिंधुदुर्ग) : क्यार, महाचक्रीवादळ आणि त्यानंतर कोरोना महामारीमुळे बंद पडलेला पर्यटन व्यवसाय नव्या जोमाने सुरू करण्याचे फार मोठे आव्हान तळकोकणातील पर्यटन व्यावसायिकांसमोर उभे राहिले आहे. पर्यटन व्यवसाय पुन्हा त्याच दमात सुरू करायचा असेल तर शासनाने येथे येणार्‍या पर्यटकांची हमी घेण्याबरोबर देशातील पर्यटक जिल्ह्यात यावेत यासाठी मंत्रालय स्तरावर टूर ऑपरेटर्स, पर्यटन व्यावसायिक यांची समिती स्थापना करण्याची गरज ठळक झाली आहे.

देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग ओळखला जातो. तरीही पर्यटन विकासासाठी शासनाकडून गेल्या काही वर्षात फारसे प्रयत्न झालेले नाहीत. जिल्ह्यातील स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी स्वतः पुढाकार घेत बँकांची कर्जे काढून पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या आहेत. गेल्या काही वर्षात जिल्ह्याच्या टुरिझम इंडस्ट्रीमध्ये जी वाढ झाल्याची दिसते त्यात स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचे मोठे योगदान आहे. 

शेतकरी, मच्छीमारांबरोबरच पर्यटन व्यवसायालाही निसर्गाच्या लहरीपणाचा तसेच कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मोठा फटका बसला. यात गत पर्यटन हंगामात आलेले क्यार, महा चक्रीवादळ याचा फटका बसला. यात नाताळ सणाच्या काळात थोड्या फार प्रमाणात पर्यटन व्यवसाय झाला; मात्र त्यानंतर ऐन पर्यटन हंगामात कोरोना महामारीचे संकट कोसळल्याने याचा मोठा फटका जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला बसला. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग यांच्यासह वॉटरस्पोर्टस यासह अन्य पर्यटन पूर्णतः ठप्प झाले.

परिणामी पर्यटन व्यवसायात असलेले कामगारांचे पगार, वीज बिले, बँकांच्या कर्जाचे हप्ते यांसारख्या समस्यांनी पर्यटन व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले.आर्थिक घडी पूर्णतः कोलमडल्याने पर्यटन व्यवसाय केव्हा सुरू होणार याकडे व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले होते. यातच कोरोनाचे संकट अद्यापही दूर न झाल्याने पर्यटन व्यवसाय सुरू झाला तरी पर्यटक येथे येतील काय?, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पर्यटकांच्या आरोग्याबरोबरच, पर्यटन व्यावसायिकांनी घ्यावयाची काळजी यांसारखे प्रश्‍नही निर्माण होत असताना शासनाने पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा- स्मशानभूमीत स्वॅब घेतल्याचा आक्षेप, कुठले हे प्रकरण? वाचा...

नव्या दमात पर्यटन व्यवसाय सुरू होत असला तरी पर्यटन व्यावसायिकांसमोर अनेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाने उभारी घ्यायची असेल तर शासनाने पर्यटन व्यावसायिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे, अनेक पर्यटन व्यावसायिक कर्जबाजारी असून त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी बँकांच्या कर्जाची हमी शासनाने घ्यायला हवी, विदेशी पर्यटक येथे येण्याची शक्यता नसल्याने देशातील पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात यावेत यासाठी त्यांच्या आरोग्याची हमी घेण्याबरोबर जिल्ह्याच्या पर्यटनात वाढ व्हावी यासाठी शासनाने मंत्रालय स्तरावर टूर ऑपरेटर्स, पर्यटन व्यावसायिक यांची एक समिती नेमून आवश्यक उपाययोजना राबवायला हव्यात. पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनीटायझर तसेच अन्य सुविधा शासनाने छोट्या पर्यटन व्यावसायिकांना उपलब्ध करून द्यायला हव्यात अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांमधून होत आहे.

हेही वाचा- बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी ;  शक्कल लढविल्यामुळे वाचले प्राण

“आर्थिक संकटात अडकलेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या बँकांच्या कर्जाची हमी घेणे, टाळेबंदी कालावधीतील वीज बिलांचा प्रश्न यासह अन्य समस्यांच्या गर्तेतून व्यावसायिकांना बाहेर काढण्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हायला हवेत. जिल्ह्याचे पर्यटन पुन्हा जोमाने सुरू करण्याबरोबरच त्यात पुन्हा भरारी घेण्यासाठी पर्यटन मंत्र्यांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत.”
- बाबा मोंडकर, टीटीडीएस, अध्यक्ष

“पर्यटन व्यवसाय आपल्या हातात राहतो की नाही अशा मनस्थितीत येथील पर्यटन व्यावसायिक आहेत. पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेत शासनाने दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात पर्यटन सुरू करण्याची सुनियोजित कार्यपद्धती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. जे शासकीय अधिकारी पर्यटनाचे धोरण ठरवीत आहेत त्यांना कोकणातील पर्यटनाची काडीमात्र माहिती नाही असे खेदाने म्हणावे लागेल. हॉटेल्स, लॉजिंग सुरू करण्याचे जाहीर केले असले तरी त्यात रेस्टॉरंटचा उल्लेख नसल्याने संभ्रमाचे  वातावरण आहे. कारण कोकणात सर्व सुविधांनी युक्त अशी मोजकीच हॉटेल्स आहेत. तर निवास न्याहारी, रेस्टॉरंट यांची संख्या जिल्ह्यात जास्त आहे. यात जेवणाची, राहण्याची व्यवस्था ही स्वतंत्र आहे. त्यामुळे रेस्टॉरंटला परवानगी मिळाली नाही तर पर्यटन उद्योगाला चालना मिळाली असे म्हणता येणार नाही. हा संभ्रम जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता धूसर आहे.”
- नितीन वाळके, पर्यटन व्यावसायिक

 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: challenge of reviving tourism in Talakona Many disasters Expect strong support from the government