स्मशानभूमीत स्वॅब घेतल्याचा आक्षेप, कुठले हे प्रकरण? वाचा...

Objection to taking a swab in the cemetery konkan sindhudurg
Objection to taking a swab in the cemetery konkan sindhudurg

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कोळपे येथील आत्महत्याग्रस्त व्यक्तींचे रात्री उशिरा स्मशानभुमीत जाऊन स्वॅब घेतले. या प्रकारामुळे गावातील लोकांमध्ये कोरोनाबद्दलची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने स्वॅब घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वजा मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे केली आहे.

जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिलेल्या निवेदनात श्री.काझी यांनी म्हटले आहे की, 29 ऑगस्टला कोळपे बौध्दवाडी येथील महादेव सखाराम कांबळे यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार ग्रामीण रूग्णालय वैभववाडी येथे आणला; परंतु तेथील डॉक्‍टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी शवविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

ते शव कोळपे येथे नेण्यात आले; परंतु मृताचे नातेवाईक मुंबईहून येणार असल्यामुळे अंत्यविधी करण्यात आले नव्हते. त्याच रात्री दीड वाजता शवविच्छेदन करण्यास नकार देणाऱ्या डॉक्‍टरने स्मशानात जाऊन स्वॅब घेतले. या सर्व प्रकारामुळे कोळपे येथील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्वॅब त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून घेतला. स्वॅब घेण्यापुर्वी त्यांनी वरिष्ठांची पुर्वपरवानगी घेतली आहे का ?

शवविच्छेदनापुर्वी स्वॅब घेतले का असे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत या सर्व प्रकाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, प्रशासनाने कारवाई केली नाही तर जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री. काझी यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांना दिला आहे. 

पाळत ठेवल्याची तक्रार 
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश पाटील हे आपल्या पाळत ठेवणे, मला त्रास होईल असे कृत्य करणे असे प्रकार वारंवार करीत आहेत. अशा आशयाचा तक्रार अर्ज डॉ.सचिन बरगे यांनी 24 ऑगस्टला पोलीसात दिला आहे. 

कोळपे हा गाव कंटेन्मेंट झोन आहे. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वरिष्ठांच्या सल्ल्याने आणि पुर्वपरवानगी घेवुनच मृत व्यक्तीचा स्वॅब घेतला. त्यात वाईट हेतू नव्हता; परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. ज्या दिवशी हा प्रकार झाला त्या दिवशी माझी ड्युटी नव्हती तरीही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी माझ्याकडुन कटरचे काम करून घेतले. याशिवाय वेगवेगळ्या पध्दतीने मला त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. यासंदर्भात मी त्यांच्याविरोधात 24 ऑगस्टला देखील पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. 
- डॉ. सचिन बरगे, बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय वैभववाडी. 

डॉ. सचिन बरगे हे ग्रामीण रूग्णालयात काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा माझा संबंधच येत नाही; परंतु कोळपे प्रकरणात ते चुकीचे वागले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी काल तहसिदारांच्या समक्ष माफी मागीतली आहे. स्वॅब घेण्याच्या काही पध्दती प्रशासनाने निश्‍चित केलेल्या आहेत. त्या पद्धतीनुसारच काम करावे लागते. डॉ. बरगे यांच्या चुकीच्या वागण्यामुळे आरोग्य बदनाम झाला आहे. याबाबतच अहवाल वरिष्ठांना दिला आहे. 
- डॉ. उमेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैभववाडी. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com